देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. शुक्रवारपासून देशात किसान रेल्वे सेवा सुरू होणार आहे. या रेल्वे सेवेचा फायदा अनेक राज्यांमधल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या किसान रेल्वेची सुरूवात महाराष्ट्रापासून ते बिहारपर्यंत होणार आहे. नाशिकजवळच्या देवळाली रेल्वे स्टेशनपासून बिहारच्या दानापूर रेल्वे स्टेशनपर्यंत किसान रेल्वे चालवण्यात येणार आहे. किसान रेल्वे या दोन स्टेशनमधलं १,५१९ किमीचं अंतर ३२ तासांमध्ये पूर्ण करेल.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी किसान रेल्वेची घोषणा केली होती. किसान रेल्वे ही स्पेशल पार्सल ट्रेन असेल, ज्यामध्ये धान्य, फळ आणि भाजीपाला पाठवण्याची व्यवस्था असेल.
असा असणार मार्ग
किसान रेल्वे देवळाली-नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर आणि बक्सर या स्टेशनवर थांबेल. पहिल्या टप्प्यातल्या या किसान रेल्वेचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.