अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि प्राणघातक बॉम्बनी सुसज्ज असलेले भारतीय हवाई दलातील सर्वात प्राणघातक लढाऊ विमान राफेल 29 जुलैला अंबाला येथे पोहोचणार आहेत. सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊन संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. याबाबत हाती आलेल्या वृत्तानुसार हवाईदलाच्या तळाभोवती छायाचित्रण आणि व्हिडिओग्राफीवर बंदी घालण्यात आली आहे. आठवड्याभरात ही विमाने कोणत्याही मोहिमेसाठी सज्ज होणार आहेत. ही लढाऊ जेट विमाने उडवण्यासाठी एकूण 12 वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
या लढाऊ विमानांच्या स्वागतासाठी भारतीय हवाई दलाने पूर्ण तयारी केली आहे. हवाई दलाचे फायटर पायलट 7000 कि.मी. हवाई अंतर पार करून बुधवारी अंबाला हवाई तळावर पोहोचतील. यावेळी एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी त्यांनी हवाई दलाच्या स्टेशनला भेट दिली. यावेळी 17 गोल्डन अॅरो स्क्वॅड्रॉनची पुन्हा स्थापना करण्यात आली. एअर चीफ मार्शल धनोआ यांनी राफेलसंदर्भात करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती घेतली. एकूण 5 राफेल विमाने 27 जुलै रोजी फ्रान्सहून भारताकडे रवाना झाली. सोमवारी अबू धाबी येथे ही विमाने उतरली. फ्रान्सहून युएईला पोहोचण्यासाठी विमानांना सात तास लागले. येथून ही विमाने अल-डाफ्रा हवाईतळावरून उड्डाण करतील आणि त्यानंतर थेट अंबाला येथे उतरतील. चीन आणि पाकिस्तानशी सुरू असलेल्या तणावामुळे ही लढाऊ विमाने भारताकडे असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. राफेल विमाने निघण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय दूतावासाने ही विमाने आणि भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे.
राफेलने हवेमध्येच इंधन भरले
फ्रान्समधून भारतात येताना राफेल लढाऊ विमानांना हवेमध्ये इंधन भरण्यात आले. भारतीय वायुसेनेने सहकार्याबद्दल फ्रान्सच्या हवाई दलाचे आभार मानले आहेत. ही राफेल विमाने सुमारे 10 तासांचा प्रवास करून भारतात येत आहेत. त्या दरम्यान त्यांना अबूधाबी येथे थांबविण्यात आले. राफेल अल धफ्रा तेथील एअरबेसवर उतरला. येथे विश्रांतीसाठी पायलट विमाने थांबवण्यात आली. सुमारे 10 तासांच्या प्रवासात राफेलमध्ये दोनदा हवेने इंधन भरले जाईल. यासाठी दोन विमाने त्यांच्याबरोबर स्वतंत्रपणे असतील.
आठवडाभरात हाती घेतली जाईल मोहीम
चीनच्या सीमेवर सध्याची परिस्थिती पाहता राफेल पोहोचताच त्यांना कामाला लावले जाईल असे वाटते. सूत्रांच्या माहितीनुसार, ही विमाने आठवड्याभरात कोणत्याही मोहिमेसाठी तयार होतील. राफेल विमान हे जगातील सर्वात प्राणघातक क्षेपणास्त्र आणि सेमी-स्टिल्ट तंत्रज्ञानाने सज्ज आहे. भारतीय विमानांच्या ताफ्यात या विमानांचा समावेश केल्याने देशातील युद्ध सामर्थ्यात लक्षणीय वाढ होईल, हे नक्की.