तामिळनाडूतील नमक्कल जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. येथील एका घरात फटाके बनवताना स्फोट झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. फटाक्यांच्या दुकानाचा मालक आणि तीन महिलांसह चार जण ठार झाले आणि जवळपास तेवढेच लोक जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.
मोहनूर येथील एका घरात पहाटे चारच्या सुमारास स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, परिसरातील काही घरांचेही नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्यांनी सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. तिल्लई कुमार (37),आई सेल्वी (57) आणि पत्नी प्रिया (27) अशी मृतांची नावे आहेत. याशिवाय शेजारी राहणाऱ्या 70 वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला.
या घटनेबाबत पोलीस अधिका-यांनी सांगितले की, हा स्फोट विजेच्या शॉर्टसर्किटमुळे झाला की फटाके पेटवणाऱ्या मेणबत्तीमुळे झाला, याचा तपास सुरू आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आणि शोकाकुल कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत करण्याचे आदेश दिले आहेत.