विद्यार्थिनींच्या समस्या आणि गरजा लक्षात घेऊन पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडने मोठा निर्णय घेतला आहे. पीरियड्समुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन विद्यापीठाने सुटी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली आहे. मात्र, रजा मंजूर करताना विद्यापीठाने काही अटीही जाहीर केल्याचे बोलले जात आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
विद्यार्थ्यांना पीरियड्ससाठी एक दिवसाची सुटी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आधी नियमानुसार फॉर्म भरून मंजूर करून घ्यावा लागेल.नवीन सत्र 2024-25 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची विद्यापीठाची योजना असल्याचे मानले जात आहे. यासोबतच ही रजा कोणत्याही अटीवर वाढवता येणार नाही.
विद्यापीठाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे, मुलींना कोणत्याही महिन्यात मासिक पाळीसाठी केवळ एक दिवस सुट्टी घेता येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. मासिक पाळीसाठी परीक्षांदरम्यान रजा दिली जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. यासोबतच रजेसाठी संचालकांची परवानगी आवश्यक असणार आहे. यासाठी विद्यार्थ्याने एकतर अगोदर फॉर्म भरावा किंवा रजा घेतल्यापासून पाच दिवसांच्या आत अर्ज करावा. मात्र, यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून चौकशी करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थिनीला किमान 15 दिवस महाविद्यालयात येणे बंधनकारक आहे.या अटीवरच सुट्टी मंजूर करण्यात येईल. प्रत्येक सेमेस्टरला चार दिवस सुट्टी दिली जाईल.
मासिक पाळींसाठी सुट्टी दिली जात असल्याची देशातील ही पहिलीच घटना नाही. ही घोषणा देशात पहिल्यांदा केरळच्या कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने केली आहे. त्याठिकाणी विद्यार्थिनींना जानेवारी २०२३ पासूनच मासिक पाळीसाठी सुटी दिली जात आहे. यासोबतच आसामचे गुवाहाटी विद्यापीठ, तेजपूर विद्यापीठ, हैदराबादच्या नलसार विद्यापीठाने रजा मंजूर करण्याची व्यवस्था केली आहे.