उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दोन दिवसानंतर पोलिसांनी दोन महिलांसह एकूण सहा जणांना अटक केली.2 जुलै रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात असणाऱ्या सिकंदराराव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली आणि त्यात 121 जणांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी अटक केलेले लोक सुरजपाल जाटव म्हणजेच नारायण साकार उर्फ 'भोले बाबा' यांचा सत्संग आयोजित करणाऱ्या आयोजन समितीचा भाग होते. या घटनेतील मुख्य आरोपी आणि कार्यक्रमाचे आयोजक देवप्रकाश मधुकर याची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले आहे.
मात्र, आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत किंवा एफआयआरमध्ये कुठेही सूरजपाल जाटव उर्फ भोले बाबा यांच्या नावाचा उल्लेख नाही.
एवढंच नव्हे, तर पोलिसांनी या बाबाची साधी चौकशीही केलेली नाही.
'भोले बाबा' यांचं नाव का नाही?
'एफआयआरमध्ये या सत्संग कार्यक्रमात धार्मिक प्रवचन देणाऱ्या भोले बाबा यांचं नाव का नाही?' हा प्रश्न गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी पोलीस महानिरीक्षक शलभ माथूर यांना अनेकवेळा विचारला.
आरोपींमध्ये या बाबांचं नाव का नाही, असंही माथूर यांना विचारलं गेलं. या प्रश्नांना उत्तर देताना शलभ माथूर म्हणाले की, "कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळ उडाल्यानंतर आयोजक त्या ठिकाणाहून पळून गेले होते. या कार्यक्रमाची जबाबदारी आयोजकांवर होती आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली गेली आहे."
शलभ माथूर म्हणाले की, "सध्या या 'बाबा'ची चौकशी झालेली नसली तरी इतर आरोपींच्या चौकशीमध्ये जर त्यांची काही भूमिका असल्याचं समोर आलं तर त्यांचीही चौकशी केली जाईल."
माथूर म्हणाले की, "गरज असेल तर त्यांचीही चौकशी केली जाईल. या महाराजांचा दोष आहे की नाही हे तपासलं जाईल. आता यावर काही भाष्य करणं घाईचं ठरेल. एफआयआरमध्ये त्यांचं नाव नाहीये. या तक्रारीत या प्रकरणाची जबाबदारी आयोजकांची असल्याचं म्हटलं गेलं आहे. त्यामुळे आयोजन समितीतील सदस्यांची नावं त्यामध्ये आहेत."
हाथरस प्रकरणातील भोले बाबांच्या भूमिकेबाबत पोलिसांनी बोलणं टाळलं आणि या अपघाताची संपूर्ण जबाबदारी आयोजक आणि सेवादार (भोले बाबांच्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे त्यांचे भक्त आणि कर्मचारी) यांची असल्याची म्हटलं आहे.
पोलिसांनी अटक केलेले लोक कोण आहेत?
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हाथरसमधल्या कार्यक्रमासाठी एका समितीने परवानगी घेतली होती, या समितीचे प्रमुख वेद प्रकाश मधुकर हे होते. सध्या वेद प्रकाश त्यांच्या कुटुंबियांसह फरार आहेत.
शलभ माथूर यांनी सांगितलं की, ज्या सहा लोकांना अटक करण्यात आलेली आहे ते सर्व लोक आयोजन समितीचे सदस्य होते आणि 'सेवादार' म्हणून ते काम करायचे.
अटक झालेल्या व्यक्तींची नावं :
राम लडैते, मैनपुरी
उपेंद्र सिंग यादव, फिरोजाबाद
मेघसिंग, हाथरस
मंजू यादव, हाथरस
मुकेश कुमार, हाथरस
मंजू देवी, हाथरस
अटक केलेल्या लोकांनी याआधी देखील बऱ्याच कार्यक्रमांचं आयोजन केलं असल्याची माहिती शलभ माथूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, गर्दी जमवणे, देणगी गोळा करणे, बॅरिकेडिंगद्वारे गर्दी नियंत्रित करणे, भाविकांसाठी मंडपाची व्यवस्था करणे, वाहनांची पार्किंग, वीज, जनरेटर आणि कार्यक्रमस्थळी स्वच्छता व्यवस्था आदी गोष्टींची व्यवस्था आयोजक आणि त्यांची सत्संग समिती करतात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवादारांनी भोले बाबांच्या चरणस्पर्शासाठी गर्दीला मोकळं सोडलं, त्या गर्दीवर कुणाचंही नियंत्रण नव्हतं. बाबांच्या पायाची धूळ कपाळाला लावण्यासाठी आसुसलेल्या भक्तांनी एकच गोंधळ केला आणि नंतर महिला आणि लहान मुलं एकमेकांवर पडू लागली, चेंगराचेंगरी झाली. या प्रकारानंतर सेवादार तिथून गायब झाले.
माजी पोलीस महासंचालकांना याबाबत काय वाटतं?
2007 ते 2009 या काळात उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालक पदी राहिलेल्या विक्रम सिंह यांनी बीबीसीचे प्रतिनिधी अभिनव गोयल यांच्याशी संवाद साधताना सांगितलं की, 'हाथरस दुर्घटनेच्या मुळाशी हा बाबा आहे.'
विक्रम सिंह म्हणाले की, "एफआयआर ही घटनेची माहिती आहे आणि तपासादरम्यान त्यात आणखी काही नावांचा समावेश होऊ शकतो, परंतु माझं वैयक्तिक मत असं आहे की या संपूर्ण अपघातासाठी हा बाबाच जबाबदार आहे. त्यामुळे एफआयआरमध्ये त्याचं नाव सगळ्यात आधी असायला हवं होतं."
विक्रम सिंह म्हणतात की, "बाबांचं नाव नंतर का येईल? सत्संगाचे आयोजन करणारी समिती कुणाची होती? ती समिती या बाबाची होती. एफआयआरमध्ये बाबाचं नाव नसल्यामुळे त्यांच्याबाबतीत पोलिसांनी उदारपणा दाखवल्याचं दिसतंय. असं व्हायला नको होतं."
ते म्हणतात की, “पोलिस प्रशासनाने याआधी कुंभ, अर्धकुंभ, निवडणुका, कावडयात्रा आणि व्हीआयपी ड्युटी केली आहे, पण कुठेही असं काही घडलं नाही. असं असताना असा प्रकार कसा घडला? साहजिक आहे की तुम्ही स्वतःहून अशा घटनेला आमंत्रण दिलं. अशा कार्यक्रमांची आगाऊ सूचना मिळो अथवा न मिळो दोन्ही परिस्थितींमध्ये जबाबदारी पोलिसांचीच असते."
“पोलिसांकडे गुप्तचर यंत्रणा आहे, त्यांचे संपर्क आहेत. किती मोठा जमाव होता हे पोलिसांना कळायला हवे होते. तेथे बॅरिकेडिंग, वाहतूक, वॉच टॉवर, नियंत्रित समन्वय असायला हवा होता आणि घटनास्थळावर तसं काहीही नव्हतं."
विक्रम सिंह म्हणाले की, "अपघातासाठी केवळ आयोजक आणि सेवादारांना जबाबदार धरणे योग्य नाही, यात पोलिसांचीही मोठी भूमिका आहे."
राजकीय दबावाचा परिणाम आहे का?
राजकीय निरीक्षकांचे असं मत आहे की, या 'भोले बाबा'चे उत्तर प्रदेशात लाखो भक्त आहेत आणि दलित समाजात त्यांचा चांगला प्रभाव आहे.
स्थानिक पत्रकार पीएन शर्मा सांगतात की, “भोले बाबा स्वतः जाटव समाजातून येतात आणि त्यांचे 80 टक्के भक्तही याच समाजातील आहेत, ज्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. याशिवाय ओबीसी प्रवर्गातील लोकही त्यांच्याशी संबंधित आहेत.
ते म्हणतात की , "भोले बाबाचे उत्तर प्रदेशातील 20 हून अधिक जिल्ह्यांमध्ये नेटवर्क आहे, ज्या अंतर्गत लाखो दलित वर्गातील लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत. बाबा स्वतःला हरीचा म्हणजेच विष्णूचा अवतार मानतात."
पीएन शर्मा म्हणतात की, “मी भोले बाबांचे २० हून अधिक कार्यक्रम पाहिले आहेत. प्रत्येक कार्यक्रमात एक लाखाहून अधिक लोक जमतात आणि त्यातील बहुतांश लोक हे दलित समाजाचे असतात."
भोले बाबाच्या या लोकप्रियतेबाबत बोलताना उत्तर प्रदेशचे ज्येष्ठ पत्रकार ब्रिजेश शुक्ला म्हणतात की, "भोले बाबांचे भक्त हे प्रत्येक पक्षासाठी केवळ 'व्होट बँक 'आहेत."
ब्रिजेश शुक्ला म्हणतात की, "प्रत्येक पक्ष पीडितांबद्दल बोलतोय, पण 'बाबा'चे नाव घ्यायला कोणी तयार नाही, कारण त्यांची व्होट बँक कोणीही बिघडवू इच्छित नाही, कारण 'बाबा' दलितांमध्ये लोकप्रिय आहेत."
उत्तर प्रदेशातील दलितांच्या लोकसंख्येबद्दल बोलायचे झाले तर ती वीस टक्के आहे.
मात्र, पीएन शर्मा म्हणतात की, 'भोले बाबा'ने निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिल्याचे त्यांनी पाहिले नाही. मात्र, हाथरस दुर्घटनेनंतर भोले बाबांच्या एका कार्यक्रमातला समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
Published By- Priya Dixit