अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याप्रकरणी दाऊदची बहीण हसिना पारकर यांचा मुलगा अलीशाह पारकरच्या जबाबातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हसिना यांचे दाऊदशी कसे संबंध होते, मालमत्तांचा वाद त्या कशा मिटवायच्या यासंदर्भात अलीशाहने ईडीला माहिती दिली आहे.
ईडीने अलीशाह पारकर याचा 21 फेब्रुवारीला जबाब नोंदवला होता. अलीशाहने ईडीला सांगितले, की त्याची आई हसिना पारकर ही दाऊदची बहीण असल्याचे त्यांचा समाजात दरारा होता. त्यांना बाहेर आपा या नावाने ओळखले जात होते. हसिना दाऊदच्या मालमत्तांशी संबंधित वाद मिटवत होत्या. दाऊदशी त्यांचे चांगले संबंध होते, ते वारंवार बोलायचे, एकमेकांशी संवाद साधायचे.
कुर्ला येथील गोवावाला कंपाउंडचा वाद हसिना पारकर आणि सलीम पटेल यांनी मिटवला. तेथे त्यांनी कार्यालय सुरू करून कंपाउंडचा काही भाग ताब्यात घेतला. हसिना पारकर यांच्या वतीने सलीम पटेल कार्यालयात बसून व्यवहार सांभाळत होता. मालमत्तेशी संबंधित वादाचे स्वरूप ठाऊक असल्याचे अलीशाहने सांगितले. हसिना पारकर यांनी त्यांच्या ताब्यातील भाग नवाब मलिक यांना विक्री केला. परंतु या व्यवहारा संदर्भात अधिक माहिती नसल्याचे अली शाह ईडीला सांगितले.
ईडीने मोहम्मद सलीम इक्बाल कुरेशी ऊर्फ सलीम फ्रूट यांचे जबाब 15 फेब्रुवारी रोजी नोंदवले होते. तो छोटा शकीलचा मेहुणा आहे. छोटा शकील हा दाऊद इब्राहिमच्या टोळीत असून, तो पाकिस्तानातून काम करतो. छोटा शकील गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवत असे, असे त्याने सांगितले.
मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध ईडीने गेल्या आठवड्यात दाखल केलेल्या आरोपपत्रात दाऊदची बहीण हसिना पारकरशी संबंध असून, त्यांच्यात व्यवहार झाला होता, हे सिद्ध झाले आहे. दाऊदशी संबंधित लोकांसोबत मालमत्तेच्या व्यवहारात मनी लाँड्रिग झाल्याचे सिद्ध झाले आहे. हसिना पारकर, सलीम पटेल आणि 1993 बॉम्बस्फोटातील दोषी सरदार शाह वली खान यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार करण्यात आले, असे ईडीने आरोपपत्रात नमूद केले आहे.