बलात्कार्यांना लज्जास्पद प्रसिद्धी देण्याच्या हेतूने केरळ सरकारने बलात्कार्यांची आणि लैंगिक अपराध करणारांची माहिती ऑनलाइन, सार्वजनिक प्रकारे प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यापासून इतरांनी सावध राहावे आणि त्यांना बळी पडू नये, हा त्यामागचा हेतू आहे. केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांनी केरळ विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी-गुरुवारी हे जाहीर केले आहे. असे करणारे केरळ हे देशातील पहिलेच राज्य असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. पीडितांना त्वरित आर्थिक साहाय करण्याचेही त्यांनी जाहीर केले.
ग्रामीण भागात अधिक महिला पोलीस तैनात करण्याचे आणि पोलीस दलात अधिक संख्येने महिला पोलिसांची नियुक्ती करण्याचेही त्यांनी जाहीर केले. प्रसिद्ध कार्यकर्त्या सुनीता कृष्णन यांनी म्हटले आहे की, आम्ही सरकारला लैंगिक अपराध्यांचे एक रजिस्टर जारी करण्याची विनंती केली होती. काही काळ अशा अपराध्यांची नावे जनतेसाठी प्रसिद्ध करावीत असे आम्ही म्हटले होते. सरकारने आपली विनंती मान्य केल्याद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत.