Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भर साखरपुड्यातून तरूणीचं अपहरण, आपली पत्नी असल्याचा आरोपीचा दावा, मुलीचे वडील म्हणतात..

भर साखरपुड्यातून तरूणीचं अपहरण, आपली पत्नी असल्याचा आरोपीचा दावा, मुलीचे वडील म्हणतात..
, रविवार, 11 डिसेंबर 2022 (16:27 IST)
भर साखरपुड्यातून तरूणीचं अपहरण, आपली पत्नी असल्याचा आरोपीचा दावा, मुलीचे वडील म्हणतात...
मुलीच्या साखरपुड्यादिवशी एका तरूणानं घरात घुसून केलेलं तिचं अपहरण, नातेवाईकांची पोलिस तक्रार, संबंधित तरुणी आपली पत्नीच असल्याचा आरोपीचा दावा...
 दाक्षिणात्य सिनेमासारखा ड्रामा हैदराबादच्या जवळ असलेल्या मानेगुडा परिसरात पाहायला मिळाला.
 
पोलिसांनी अपहरण झालेल्या तरुणीची सुटका केली आहे.
 
 तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासात तिची सुटका केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आतापर्यंत या प्रकरणी 31 लोकांना अटक करण्यात आली आहे.
 
 या प्रकरणातला मुख्य आरोपी नवीन रेड्डीही पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी अधिकृतरित्या याला दुजोरा दिली नाही.
 
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी (9 डिसेंबर) नवीन रेड्डी नावाचा एक माणूस 50 हून अधिक लोक घेऊन दामोदर रेड्डी यांच्या घरात घुसला. दामोदर रेड्डी हे हैदराबादच्या जवळ असलेल्या मानेगुडा परिसरात राहतात.
 
दामोदर रेड्डी यांच्या मुलीचा वैशालीचा साखरपुडा सुरू होता.
 
नवीन रेड्डी आणि त्याच्यासोबत घुसलेल्यांनी घरातल्या लोकांवर हल्ला चढवला, वस्तूंची तोडफोड केली आणि वैशालीला जबरदस्तीने घेऊन गेले. त्यांनी तिथले सीसीटीव्ही कॅमेरेही तोडले. या हल्ल्यानंतर दामोदर रेड्डी यांच्या नातेवाईकांनी लगेचच महामार्गावर धरणं आंदोलन सुरू केलं आणि मुलीच्या सुटकेची मागणी करायला सुरूवात केली. नवीन रेड्डी हा ‘मिस्टर टी’ नावाची टी शॉप्सची साखळी चालवतो. दामोदर यांच्या घरासमोरच त्याचं एक दुकान आहे. ते सुद्धा दामोदर यांच्या नातेवाईकांनी पेटवून दिलं.
दामोदर रेड्डी यांच्या तक्रारीनंतर आयपीसीच्या कलम 147,148,307,324,363,427,506,452,380 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
 
वैशालीचे वडील दामोदर रेड्डी यांनी सांगितल्याप्रमाणे, “माझी मुलगी बॅडमिंटन खेळायला जायची, तेव्हा नवीन रेड्डीला भेटली होती. तेव्हापासून तो तिला त्रास देत आहे. प्रेम आणि लग्नाच्या नावाखाली त्यानं तिला त्रास दिला.
 
शुक्रवारी 50 लोकांनी माझ्या घरावर हल्ला केला. यामध्ये नवीन रेड्डी आणि रुबेन यांचाही समावेश होता. ते व्होल्वो, बोलेरो आणि इतर गाड्यांमधून आले. सोबत त्यांनी दगड आणि लोखंडी सळया आणल्या होत्या. नवीनने लोखंडी सळईने मला मारहाण केली. माझ्या मित्राने त्याला अडवायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यालाही त्यांने मारलं.”
 
“नंतर ते जबरदस्तीने माझ्या मुलीला गाडीत कोंबून घेऊन गेले.”
घरातील सामानासोबतच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केल्याचं दामोदर रेड्डींनी पोलिस तक्रारीत म्हटलं आहे.
आरोपी त्या मुलीला आधीपासून ओळखत होता?
नवीन रेड्डीने मात्र वेगळाच दावा केला आहे. त्याने आपलं वैशालीशी आधीच लग्न झाल्याचं म्हटलं आहे.
 
एलबीनगर न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्यांनं अशा अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत.
 
“जानेवारी 2021 पासून आम्ही एकमेकांसोबत होतो, आमचं प्रेम होतं. तिचे पालकही मला ओळखत होते. वैशालीच्या नातेवाईकांनी माझ्या पैशांवर अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रिपही काढल्या आहेत,” असं नवीनने म्हटलं.
 
त्याने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, 4 ऑगस्ट 2021ला आम्ही एका मंदिरात लग्न केलं.
 
पण तिचं बीडीएसचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिने कोणालाही लग्नाबद्दल सांगितलं नाही. हे काय कॉलेजमध्ये येता-जाता झालेलं प्रेम प्रकरण नव्हतं.
 
पण नंतर त्या लोकांनी आमचं लग्नच झालं नाही, असं सांगायला सुरूवात केली. लग्नासंबंधीचे सगळे पुरावे तिच्याकडे होते, तेही त्यांनी नष्ट केले. त्यामुळे मला ते कोर्टात सादर करता येत नाहीयेत.”
वैशालीचे कुटुंबीय तिला सोडावं म्हणून मला धमकी देत होते. यासंबंधी एक तक्रारही पोलिसांत केली आहे. आम्ही दोघं केवळ सोबत राहात होतो आणि आमचं लग्न झालंच नाही, असं सांगण्यासाठी तिचे पालक दबाव टाकत होते.
 
मी जेव्हा व्होल्वो कार विकत घेतली, तेव्हा इन्शुरन्सवर नॉमिनी म्हणून वैशालीचं नाव आहे. अंबरपेटमध्ये माझं सर्वांत मोठं दुकान आहे. तिथला स्कॅनर हा वैशालीच्या नावे आहे. त्यामुळे इथे होणाऱ्या ऑनलाइन पेमेंटचा पैसा वैशालीकडे जात आहे, असं प्रतिज्ञापत्रात नवीनने म्हटलं आहे.
 
आपल्या पत्नीला आपल्याकडे पाठविण्यात यावं, असं त्यानं म्हटलं आहे.
पण वैशालीच्या कुटुंबीयांचं वेगळं म्हणणं आहे. तिला नवीनशी लग्न करायचं नसल्याचं पोलिसांना आधीच सांगितलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
‘तिला लग्न करायचं नसल्याचं वैशालीने कोर्टातही सांगितलं होतं. नवीनला ती त्याच्याशी लग्न करत नसल्याचा राग होता. त्यामुळेच त्याने हा हल्ला केला,’ असं वैशालीच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
 
आमच्या जातीतले काही लोक वैशालीने नवीनशी लग्न करावं म्हणून दबाव आणत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
 
‘नवीनने मला मारहाण केली, धमकी दिली’
आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणी 31 लोकांना अटक केली आहे. त्यांच्यापैकी काही जण तेलंगणाचे आहेत, तर बाकी लोक इतर राज्यातले आहेत.
 
‘वैशाली अजून धक्क्यात आहे. तिला मारहाण झाली. ती घाबरलेली होती. ती बोलण्याच्याही परिस्थितीत नाहीये. आम्ही अपहरण झाल्यानंतर अवघ्या सहा तासांत तिची सुटका केली,’ असं पोलिसांनी सांगितलं आहे.
 
नवीन रेड्डीच्या आईने माध्यमांशी बोलताना म्हटलं की, नवीन त्या मुलीला आधीपासूनच ओळखतो. लग्नाची परवानगी मागायला ते घरीही आले होते. नवीन तिच्याशी लग्न झाल्याचं सांगत आहे, पण मी काही त्यांचं लग्न पाहिलं नाहीये.
वैशालीने माध्यमांशी बोलताना आपलं अपहरण तसंच छळ झाल्याचं सांगितलं. “नातेवाईकांनी मला त्याच्याशी लग्न कर सांगितल्यावर मी नकार दिला होता. त्यानंतर नवीन रेड्डीने मला त्रास द्यायला सुरूवात केली. त्यानं फेक इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून मला ब्लॅकमेल करायला सुरूवात केले. त्यावरचे फोटो हे मॉर्फ्ड होते.” नवीनने अपहरण केल्यानंतर कारमध्ये आपल्याला मारहाण केली, असंही तिनं म्हटलं होतं. “मी त्याचं ऐकलं नाही, तर माझ्या वडिलांना मारण्याची धमकी दिली. माझं नवीनशी लग्न झालेलं नाहीये. ज्यादिवशी आमचं लग्न झाल्याचा दावा नवीन करत आहे, त्यादिवशी मी आर्मी हॉस्पिटलमध्ये होते,” असं वैशालीनं म्हटलं.
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसला भीषण अपघात, 22 जखमी