Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वायनाडमध्ये दरड कोसळली, मृतांचा आकडा 100 वर, शेकडो लोक अडकल्याची भीती

वायनाडमध्ये दरड कोसळली, मृतांचा आकडा 100 वर, शेकडो लोक अडकल्याची भीती
, मंगळवार, 30 जुलै 2024 (19:34 IST)
मंगळवारी (30 जुलै) केरळमधील वायनाड जिल्ह्यात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली आहे. अनेक लोक या दरडीखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय.आतापर्यंत 100जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी दिली आहे.
 
मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय.
 
या बचावकार्यादरम्यान जवळपास 250 लोकांना वाचवण्यात आलंय. तसंच, किमान 163 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं, "सध्या दरडीखाली अडकलेल्या लोकांचा एकूण आकडा सांगता येणं शक्य नाही. दुर्घटनाग्रस्त भागात चहाचे मळे असून दरड कोसळल्याने त्या भागात हेलिकॉप्टरही उतरण्यास अडचणी येत आहेत."
 
दुर्घटनाग्रस्त भागातील एका चहाच्या मळ्यात सुमारे 150 कुटुंबे राहत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
अग्निशामन दल, एनडीआरएफ, कन्नूर डिफेन्स कॉर्प्स आणि नौदलाचे हेलिकॉप्टर्स बचावकार्य करत आहेत. या दुर्घटनास्थळी असलेला पूल कोसळल्यानं आणि मुसळधार पावसामुळे बचावकार्यात काहीसे अडथळे येत आहेत.
 
दरड कोसळलेल्या भागात पोहोचण्यासाठी सुरक्षा दलाला एक तात्पुरता पूल तयार करण्यास सांगण्यात आलंय. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मुख्यमंत्री कार्यालयानं ही माहिती दिलीय.
 
चूराल्लमाला ते मुंदाक्काई आणि अट्टामाला भागाला जोडणारं पूलही कोसळल्यानं बचावकार्याच्या मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत
केरळचे वनमंत्री एके ससींदरन यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "दरडीखाली किती लोक अडकले आहेत, याची नेमकी आकडेवारी सांगणं फार कठीण आहे."
 
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वायनाड येथील घटनेनंतर बचावकार्य वेगाने सुरू असल्याची माहिती दिली. या दुर्घटनेची माहिती मिळताच सरकारी यंत्रणेनं बचावकार्य सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर वायनाडच्या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले, "या घटनेबाबत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा करून परिस्थिती जाणून घेतली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांच्याशीही चर्चा केली."
 
तसंच, "भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशीही चर्चा करून त्यांना बचतकार्यात मदत करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जे काही करता येईल ते करावे हे सुनिश्चित करण्यास सांगितलं," असंही मोदी म्हणाले.
 
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या घटनेबाबत एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत, वायनाडमधील भूस्खलनातील घटनेने अत्यंत व्यथित झालो असल्याचं म्हटलं.
 
राहुल गांधी यांनी म्हटलं की, "या घटनेबाबत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि वायनडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून सध्याच्या परिस्थितीबाबत जाणून घेतले. त्यांनी बचावकार्य प्रगतीने सुरू असल्याबाबत माहिती दिली. मी त्यांना सर्व यंत्रणांशी समन्वय साधून एक कंट्रोल रूम तयार करत मदत कार्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारची मदत करण्यासाठी विनंती केली आहे." तसंच, "मदतकार्यासाठी आवश्यक असलेल्या मदतीची माहिती द्यावी, मी त्यांना वायनाडला शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलयं," अशीही माहिती राहुल गांधींनी दिली
तर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी वायनाडच्या दुर्घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केलं.
 
प्रियंका गांधी म्हणाल्या, “या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. प्रत्येकजण सुखरुप बाहेर यावं यासाठी मी प्रार्थना करत आहे. सरकारने त्वरित मदत आणि जलद बचावकार्यासाठीचे प्रयत्न करावेत. तसंच, UDF च्या कार्यकर्त्यांना विनंती करते की, त्यांनी या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या सर्व लोकांना मदत आणि सांत्वन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, अशी विनंती करते."
पंतप्रधान कार्यालयाकडून या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये, तर जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केलीय.
वायनाडमध्ये यापूर्वीही घडल्यात भूस्खलनाच्या घटना
वायनाड हा केरळचा डोंगराळ भाग असून येथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात.
 
कोळीकोड विमानतळ ते वायनाड हे अंतर सुमारे 86 किलोमीटर आहे.
 
वायनाड हे कर्नाटकातील कोडागु आणि म्हैसूर जिल्ह्यांच्या उत्तरेस आणि तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यांच्या उत्तर-पूर्वेस आहे.
 
वायनाडमध्ये यापूर्वीही अनेक भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
 
राजकीयदृष्ट्याही वायनाड जिल्ह्याला महत्त्व आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे 2019 आणि 2024 असे सलग दोनवेळा वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, 2024 म्हणजे विद्यमान लोकसभेत ते उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधूनही जिंकल्यानं त्यांनी वायनाड मतदारसंघ सोडला आणि तिथून काँग्रेसनं प्रियंका गांधी यांना उमेदवारी जाहीर केलीय.
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उरण हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात