कुख्यात दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीजवळ सुशोभीकरण प्रकरणी मुंबई पोलीस उपायुक्त अॅक्शन मोडमध्ये आले असून याकूब मेमन कबर सुशोभीकरण प्रकरणी चौकशी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. एल.टी. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक याप्रकरणी तपास करणार अल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, वक्फ बोर्ड, महानगरपालिका, चॅरिटी कमिश्नर यांच्याकडूनही या प्रकरणाची माहिती घेण्यात येणार आहेत.
बाबरी मशीद पाडल्यानंतर 1992 मध्ये देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्यातूनच टायगर मेमनने 1993मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले. यात 257 जणांनी आपला जीव गमावला होता. बॉम्बस्फोट प्रकरणात आर्थिक सहभाग आढळल्यानंतर याकुब मेमनला न्यायालयाने दोषी ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाने क्षमायाचनेच्या याचिका फेटाळल्यानंतर याकूबला 30 जुलै 2015 रोजी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली होती. मृतदेह दक्षिण मुंबईच्या मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता. त्याच्या कबरीवर लायटिंग आणि संगमरवर बसविण्यात आल्याचे समोर आले. ही जागा बेरियल वक्फ बोर्डाच्या अख्यत्यारीत आहे.
दरम्यान, १८ मार्च २०२२ रोजी कबरीवर लाईट्स लावण्यात आल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. शब ए बारातच्या दिवशी लाईट्स लावण्यात आल्या आहेत. या दिवशी पूर्वजांच्या कबरीवर प्राथर्ना करण्याची पद्धत आहे. त्यामुळे याकूब मेमनच्या कबरीवर लाईट्स लावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.