वाराणसी:केंद्रातील आधीच्या सरकारांना बहुधा विकासाबद्दल द्वेष वाटायचा. निवडणुका जिंकण्याच्या उद्देशातून त्यांनी कार्यक्रम राबवले आणि एकप्रकारे सार्वजनिक निधीचा गैरवापर केला, असे टीकास्त्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडले.
मोदी त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघाच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी आज दाखल झाले.
मतदारसंघासाठी त्यांनी सुमारे 1 हजार कोटी रूपयांच्या योजना जाहीर केल्या. काही योजनांच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या सभेत बोलताना त्यांनी मागील सरकारांवर निशाणा साधला. राजकीय समीकरणे ध्यानात घेऊन मागील सरकारे केवळ योजनांची उद्घाटने करायचे. त्या योजना पूर्ण केल्या जायच्या नाहीत. याउलट, आम्ही प्रकल्पांचे उद्घाटन करतो आणि ते पूर्णही करतो, असे ते म्हणाले.
आपल्या सर्व समस्यांवर विकास हा उपाय आहे. गरिबांचे सबलीकरण करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. विकासाचे स्वप्न पूर्ण होऊन गरिबांचे जीवन बदलल्याचे आणि त्यांना संधी मिळाल्याचे पाहणे हे आमचे उद्दिष्ट आहे. वारसा म्हणून मुलाला गरिबी द्यावी असे कुठल्याच गरीब व्यक्तीला वाटणार नाही. गरिबीचे उच्चाटन हेच आमच्या सरकारचे स्वप्न आहे, अशी ग्वाही यावेळी मोदींनी दिली