राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ३६५ दिवस निवडणुकांसाठी तयार आहे असा दावा पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कोल्हापूर येथे मध्यावधी निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. या पत्रकार परिषदेत खासदार सुळे यांनी राज्यातील इतर घडामोडींवरही भाष्य केले.
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण कर्जमाफीबाबत सरकारमध्येच स्पष्टता नाही. या सरकारने ६० पेक्षा जास्त वेळा कर्जमाफीबाबत अध्यादेश काढला आहे असे त्या म्हणाल्या. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्त्या मिळालेल्या नाहीत, हे सरकार नीट मुंबई विद्यापीठाचा निकाल लावू शकले नाही. सरकारचा कारभार म्हणजे सावळा गोंधळ आहे असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे सरकारचे अपयश आहे. दिलेले आश्वासन न पाळणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वात पुढच्या आठवड्यात आंदोलन छेडले जाईल अशी माहितीही सुळे यांनी दिली.