Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'मोदींसोबत विदेशी दौर्‍यांवर जाणार्‍यांची नावे सांगावीत'

'मोदींसोबत विदेशी दौर्‍यांवर जाणार्‍यांची नावे सांगावीत'
नवी दिल्ली , सोमवार, 29 जानेवारी 2018 (11:38 IST)
राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत विदेशी दौर्‍यांवर जाणार्‍या व्यक्तींची नावे जाहीर करण्यास पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) नकार देऊ शकत नाही, असे मुख्य माहिती आयु्क्त आर. के. ठाकूर यांनी ठणकावून सांगितले आहे. मोदींसोबत विदेशी दौर्‍यांवर जाणार्‍या शिष्टमंडळातील सदस्यांची नावे 30 दिवसांच्या आत जाहीर करावीत, असे निर्देश त्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत.
 
सुरक्षा अधिकारी आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयीच्या माहितीशी संबंधित व्यक्तींची  नावे जाहीर करण्यापासून मुख्य माहिती आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालयाला सूट दिली आहे. पंतप्रधानांसोबत विदेशी दौर्‍यांवर जाणार्‍या बिगर सरकारी व्यक्ती अथवा सुरक्षेशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींची नावे माहिती अधिकार कार्यकर्त्यांना दिली पाहिजेत, असे ते म्हणाले.
 
मोदींसोबत विदेशी दौर्‍यावर जाणार्‍या शिष्टमंडळातील सदस्यांची माहिती नीरज शर्मा  आणि अयुब अली यांनी माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. मात्र, त्यांना योग्य ती माहिती मिळाली नाही. शर्मा यांनी खासगी कंपन्यांचे सीईओ, मालक अथवा भागीदार, तसेच खासगी उद्योगातील अधिकार्‍यांची माहिती मागितली होती. याशिवाय अली यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान आणि कार्यालयाचा मासिक खर्च, पंतप्रधानांच्या भेटीची प्रक्रिया, त्यांनी निवासस्थान आणि कार्यालयात कुणाकुणाच्या भेटी घेतल्या त्याची आकडेवारी, त्यांनी घेतलेल्या निवडणूक संभांची आकडेवारी आणि त्यावर झालेल्या सरकारी खर्चाची माहिती मागितली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रॉजर फेडरर विजेता