शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी संबंधित कंपनी किंवा विभागाकडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्राची सत्यता पडताळण्यात येते. त्यावेळी अनेकदा विद्यापीठ प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. आता 'एनएडी'च्या माध्यामातून ही प्रक्रिया अत्यंत सुलभ होणार असून एका 'क्लिक'वर त्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी शक्य होईल. सोबतच उच्च शिक्षणासाठी कर्ज घेण्याची प्रक्रियासुद्धा सोपी होणार आहे. शिक्षण घेतल्यावर मिळणारे प्रमाणपत्रे, गुणपत्रक व पदवी आपल्या शिक्षणाची साक्ष देत असतात. विद्यार्थ्यांची सर्व माहिती अधिक काळ साठवून ठेवणे संबंधित शैक्षणिक संस्थांना शक्य होत नाही. ही अडचण दूर करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून 'नॅशनल अँकॅडमिक डिपॉझटरी'(एनएडी)ची स्थापना करण्यात आली. या यंत्रणेतून देशभरातील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना त्यांचे रेकॉर्ड डिजिटल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.