मुंबई- स्कॉर्पिन वर्गातील तिसरी पाणबुडी आयएनएस करंजचे बुधवारी जलावतरण करण्यात आले. मेक इन इंडिया अंतर्गत ही पाणबुडी तयार झाली आहे. शत्रुला लक्ष्य करणे आणि पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करण्याची क्षमताही या पाणबुडीत आहे.
स्कॉर्पिन वर्गातील सहा पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम माझगाव गोदी येथे सुरु आहे. प्रकल्प 75 अंतर्गत या पाणबुड्यांची बांधणी सुरु असून यापूर्वी कलवरी आणि खांदेरी या पाणबुडीचे जलावतरण पार पडले होते. याच वर्गातील तिसरी पाणबुडी करंजचे बुधवारी मुंबईत जलावतरण करण्यात आले. या सोहळ्याला नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा हे उपस्थित होते.
स्कॉर्पिन वर्गातील कलवरी, खंदेरीचे जलावतरण यापूर्वीच झाले आहे. प्रकल्प 75 अंतर्गत तयार होणार्या सहा पाणबुड्या 2010 पर्यंत नौदलात सामील करण्याचे उद्धिष्ट आहे. करंज पाणबुडी मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली संपूर्ण भारतीय बनावटीची पाणबुडी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शत्रूंचा अचूक हेरुन त्यांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी कमी आवाजामुळे शत्रूंना चकवा देखील देऊ शकते. हिंद महासागरात सक्रिय असलेल्या चीनला टक्कर देण्यासाठी भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर पडणे गरजेचे आहे.