Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नितीश कुमार यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली

नितीश कुमार यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली
, रविवार, 28 जानेवारी 2024 (17:25 IST)
राजभवनात शपथविधी सोहळा सुरू झाला.शपथविधी सोहळ्यात नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर विजय कुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी तिघांनाही शपथ दिली
 
नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून आज 28 जानेवारी 2024 रोजी शपथ घेतली आहे. ते बिहारचे नवव्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी शपथ दिली.
 
यावेळेस भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान गटाचे चिराग पासवानही उपस्थित होते.
 
सकाळी दिला होता राजीनामा
नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तसंच इंडिया आघाडीतूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारची राजधानी पाटण्यात त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
 
ते म्हणाले, “आज मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरकार बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
काही तणावाचं वातावरण होतं. विविध स्तरातील लोक, पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्या काही सूचना, मते येत होती. त्याचा विचार करूनच आज राजीनामा देऊन सरकार बरखास्त केलं आहे.
 
आम्ही आधीची आघाडी सोडून नवी आघाडी तयार केली होती. पण आता आम्ही वेगळे झालो आहोत. आता आधी जे पक्ष एकत्र होते ते पुन्हा एकत्र येण्याचा विचार करतील. तसा निर्णय झाला तर सर्वांना कळेलच.
 
जेवढं काम करत होतो, त्याचा तेवढा मोबदला मिळत नव्हता. इतर कोणी कामच करत नव्हतं. सगळ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळं अखेर निर्णय घेतला.
 
आज जे काही ठरेल त्यानुसार तुम्हाला माहिती मिळेल.”
 
नितीश कुमार पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेससोबतच्या महाआघाडीला सोडचिठ्ठी देऊन ‘एनडीए’मध्ये सामील होऊ शकतात, या तर्कवितर्कांना गेल्या दोन तीन दिवसांपासून उधाण आलं होतं.
 
नितीश कुमार भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या.
मात्र जनता दलाच्या नेत्यांना याचा वारंवार इन्कार केला होता.
 
भाजप नेत्या रेणू देवी म्हणाल्या की, "मला याबद्दल काहीही माहिती नाही. सध्या आम्ही लोकसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रित केलं असून त्याच्या तयारीत गुंतलोय."
 
महत्त्वाचं म्हणजे, नितीश कुमार यापूर्वी म्हणाले होते की ‘एनडीए’मध्ये परत जाणार नाही आणि नितीश कुमार यांच्यासाठी ‘एनडीए’चे सर्व दरवाचे बंद असल्याचं भाजपने म्हटलं आहे.
 
या आठवड्यात, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना नितीश कुमार यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटलं होतं की, कर्पूरी ठाकूर यांनी कधीच त्यांच्या कुटुंबाची बाजू घेतली नाही पण आजकाल लोक आपल्या कुटुंबाला पुढे रेटण्यात धन्यता मानत आहेत. यानंतर ते महाआघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.
 
बहाणा की सर्व आधीपासूनच ठरलेलं?
2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2013 मध्ये नितीश कुमार यांनी ‘एनडीए’ची साथ सोडली होती. त्यानंतर त्यांनी ‘राजद’ आणि काँग्रेससोबत महाआघाडी तयार केली होती.
 
2017 मध्ये ते महाआघाडीपासून बाहेर पडले आणि पुन्हा ‘एनडीए’मध्ये सामील झाले. नंतर त्यांनी ‘एनडीए’सोबत संबंध तोडले आणि पुन्हा महाआघाडीत सामील झाले.
 
अनेकवेळा बाजू बदलल्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये त्यांना ‘बाजू बदलणारे’ अशी उपाधी देण्यात आली आहे.
 
पाटणा येथील ए. एन. सिन्हा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीजचे माजी संचालक डी. एम. दिवाकर म्हणतात की, "नितीश सत्तेचं राजकारण करतात. ते कधी कसं वागतील हे कुणीच सांगू शकत नाही आणि त्यांना याची चांगली कल्पना आहे की सत्तेच्या चाव्या हातात असतील तर कसलीच चिंता करण्याचं कारण नाही.”
 
दरम्यान, पाटण्यातील ज्येष्ठ पत्रकार सुरूर अहमद म्हणतात, “(जर ही बातमी खरी असेल तर) ते खूपच आत-बाहेर करत आहेत. लालू प्रसाद यादव यांच्यासोबत असणा-या लोकांचं म्हणणं आहे की, लालूजींनी कायम एक भूमिका घेतलेली आहे. दुसरीकडे, नितीश कुमारांकडे बघा, तुम्ही दीड वर्षांपूर्वी आलात, शिक्षकांना पुन्हा कामावर घेतलं आणि आता हे? कर्पूरी ठाकूर प्रकरण (बहाणा) होतं की हे सर्व आधीपासूनच सुरू होतं?
 
नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचं अध्यक्षपद न दिल्यामुळे ते आधीपासूनच नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यामांमध्ये होत्या. आघाडीतील मित्रपक्षांमधील जागावाटपाबाबतच्या समन्वयाला झालेला विलंब हेसुद्धा त्यांच्या नाराजीचं आणखी एक कारण होतं.
 
बिहारमधील 'नितीश फॅक्टर'
राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू होण्यापूर्वी ‘जदयू’ नेते के. सी. त्यागी यांनी बीबीसीशी बोलताना चिंता व्यक्त केलेली की, राहुल गांधींच्या दिल्लीतील अनुपस्थितीमुळे इंडिया आघाडीतील मित्रपक्षांमधील जागावाटपाच्या चर्चेवर परिणाम होऊ शकतो.
 
यानंतर नितीश कुमार यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना घराणेशाहीच्या राजकारणावर निशाणा साधला होता.
 
जनता दल युनायटेडने याचा इन्कार केला असला तरी हा रोख लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाकडे असल्याचं प्रसारमाध्यमांचं म्हणणं होतं.
 
पण भाजप असो वा ‘राजद’, गेल्या काही वर्षांत आपण दोन्ही पक्षांसाठी उपयुक्त असल्याची स्वत:ची प्रतिमा नितीशकुमार यांनी तयार करून ठेवली आहे.
 
डी. एम. दिवाकर म्हणतात, “ जोपर्यंत एखादा पक्ष दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देत नाही तोपर्यंत बिहारमध्ये सरकार स्थापन करता येऊ शकत नाही. नितीश कुमार यांनी ‘राजद’ आणि भाजप असे दोन्ही पर्याय खुले ठेवले आहेत. जेव्हा त्यांचे ‘राजद’सोबत मतभेद होतात तेव्हा ते भाजपसोबत जातात. आणि जेव्हा भाजपसोबत अडचणी येतात तेव्हा ते ‘राजद’सोबत जातात.
 
ते म्हणतात, "नितीश यांच्याकडे स्वत:ची मतपेटी नाही, पण जेव्हा ते कुणासोबत युती करतात तेव्हा त्यांच्या प्रभावामुळे मत त्यांच्या पारड्यात पडतं. जातीचं राजकारण खूप वरचढ झालंय आणि जात जनगणनेनंतर प्रत्येक जातीला आपल्या प्रतिनिधित्वादेखील अंदाज येतोय.”
 
नितीश "सुशासन बाबू" कुमार
नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत राजकीय प्रवास सुरू केला होता. 1974 च्या विद्यार्थी चळवळीपासून याला सुरुवात झाली होती.
 
1990 मध्ये लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री बनले तेव्हा नितीशकुमार हे त्यांचे महत्त्वाचे सहकारी होते. परंतु 1994 साली त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली.
 
1995 मध्ये नितीशकुमार यांच्या समता पक्षाने पहिल्यांदा लालूप्रसाद यादव यांच्या राजवटीतील 'जंगलराज’ला मुद्दा बनवलेलं. याच मुद्द्यावर विरोधकांनी 2000 आणि 2005 च्या निवडणुका लढवल्या, 2005 मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आलं.
 
सुरुवातीच्या काळात 'प्रामाणिक' आणि ‘सुशासन बाबू' अशी प्रतिमा असलेल्या नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात स्वत:ला एक ठोस पर्याय म्हणून उभं करण्यात यश मिळवलं.
 
पाटणा येथील ज्येष्ठ पत्रकार सुरुर अहमद म्हणतात, "2005-2010 मध्ये त्यांनी केलेल्या कामामुळे ते राज्यात प्रसिद्ध झाले. तेव्हापासून कोणतीही जात, समुदाय, पक्ष किंवा समाज असो, स्वत:च्या बळावर 12 ते 13 टक्के मतं मिळवत आले आहेत. याच कारणामुळे डाव्या विचारसरणीची लोकं त्यांना सामील झाली आहेत. लालूंच्या विरोधातील पर्याय म्हणून उभं राहिल्यानंतर त्यांचं जे स्थान होतं, त्याची विश्वासार्हता कमी झालेली असली तरी आजही ते स्थान कायम आहे."
 
नितीश कुमार यांनी बिहारमधील अत्यंत मागास समाज आणि दलितांची एक मोठी मतपेटी तयार केली आणि या गटाने त्यांना कायम पाठिंबा दिलाय.
 
2007 मध्ये नितीश कुमार यांनी दलितांमधील सर्वात मागासलेल्या जातींसाठी 'महादलित' श्रेणी तयार केली. त्यांच्यासाठी सरकारी योजना आणल्या. नितीश कुमार स्वतः कुर्मी जातीत मोडतात.
 
सध्या ते राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि काँग्रेससोबतच्या महाआघाडीचा भाग आहेत.
 
अलीकडील राजकीय घडामोडी आणि तर्कवितर्क
गेल्या काही दिवसांपासून ‘राजद’ आणि ‘जदयू’ यांच्यातील मतभेद वाढल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत.
 
डी. एम. दिवाकर यांच्या मते ‘राजद’सोबत ‘जदयू’चा वाद होण्याची स्वत:ची वेगळी अशी कारणं आहेत.
 
ते म्हणतात, "उदाहरणार्थ, बिहारमध्ये ‘राजद’ने तेजस्वी यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केलेली आणि तुम्ही केंद्रातील राजकारणात काय चाललंय ते पाहा."
 
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ‘जदयू’ने भाजपसोबत निवडणूक लढवली आणि पक्षाने 17 जागांवर उमेदवार उभे केले. पण दिवाकर यांच्या म्हणण्यानुसार, ‘जदयू’ला यावेळी सांगितलं गेलं की समीकरणं आणि युती बदलल्यामुळे ‘जदयू’ला 17 पेक्षा कमी जागा मिळायला पाहिजेत.
 
इंडिया आघाडीतील घटक पक्षांमधील अडचणींमुळेही नितीश कुमार खूश नव्हते. जागावाटपांबाबतच्या समन्वयाचं काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचं त्यांचं मत होतं.
 
अलीकडेच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे.
 
विरोधी पक्षांच्या महाआघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचा संकेत म्हणून याकडे पाहिलं जातंय. भाजपला सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकण्यापासून कसं रोखायचं हे आव्हान विरोधकांसमोर आहे आणि पंतप्रधान हेच देशातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याचं सर्व सर्वेक्षणातून समोर येतंय.
 
डी. एम. दिवाकर यांच्या मते, "भाजप बिहारमध्ये सत्तेत आल्यास लोकसभा निवडणुका त्यांच्याच काळात होतील, ज्याचा फायदा त्यांना निवडणुकीत होऊ शकतो."
 
त्याचबरोबर बिहारमध्ये पक्षाकडे कोणताही मोठा चेहरा नसल्याने नितीश यांना सोबत घेणं हा भाजपचा नाईलाज आहे.
 
सुरुर अहमद म्हणतात, "बिहारमध्ये भाजपकडे कोणताही मोठा चेहरा नव्हता आणि आजही नाही. उत्तर प्रदेशात कल्याण सिंह होते. मध्य प्रदेशात उमा भारती होत्या. नंतर शिवराज सिंह चौहान यांना पुढे आणण्यात आलं. बिहारमध्ये तसा चेहरा कधीच नव्हता."
 
बिहारमध्ये ‘मंदिराची लाट’ आहे का?
22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होत असताना देशाच्या अनेक भागात दीप प्रज्वलन, हवन आणि विशेष पूजा करण्यात आली. हा दिवस महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
राजकीय विश्लेषक पवन वर्मा यांच्या मते, देशातील उत्तर, पश्चिम, पूर्व किंवा दक्षिणेतील असा एकही भाग नाही जिथे राम मंदिराशी संबंधित कार्यक्रमाचा कोणताही परिणाम झाला नसेल.
 
पण पत्रकार सुरुर अहमद विचारतात की, भाजप जर नितीश कुमार यांच्याशी पुन्हा राजकीय संबंध प्रस्थापित करू इच्छित असेल, तर याचा अर्थ असा आहे का, की राम मंदिर कार्यक्रमाला बिहारमध्ये अपेक्षित परिणाम साधता आलेला नाही? डी. एम. दिवाकर म्हणतात, "श्री रामाचं मंदिर उभारण्यात आलंय. आता भविष्यातही त्याचा प्रभाव राहीलच असं नाही."
 
ते म्हणतात, "बिहारमध्ये मंदिराचा मुद्दा अचानक किंवा स्वतंत्रपणे लागू होणार नाही. अशा परिस्थितीत मंडल, कमंडलला सोबत घेऊन पुढे जाण्याची भाजपची इच्छा आहे. भाजपने इथे मागास कार्डाचा (मुद्याचा) वापर केलाय."
 
"राजकारणात कोणासाठीही कधीच दारं बंद होत नाहीत. संसदीय राजकारण हे संधीसाधूपणाच्या दलदलीत अडकलंय. आता गोष्टी कार्यकर्ते, प्रतिष्ठा किंवा जाहिरनाम्याच्या आधारावर ठरवल्या जात नाहीत. आता गोष्टी ताकद, दरारा आणि पैशाच्या आधारावर ठरतात."
 
Published By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोहन बोपन्नाः लॉन टेनिस ओपनच्या इतिहासातील सर्वात वयस्कर ग्रँड स्लॅम चॅम्पियन