दारू पिण्यासाठी आणि मोबाईल फोन खरेदी करण्यासाठी बापाने आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या मुलाला फक्त 25 हजार रूपयांना विकले. ओडिशातील भद्रक जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. बलराम मुखी असे या नराधम बापाचे नाव आहे. त्याला दारूचे व्यसन आहे. दारू आणि मोबाईल खरेदी करण्यासाठी त्याने 11 महिन्यांचे बाळ 25 हजार रूपयांना विकले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुलाच्या विक्रीतून मिळालेल्या 25 हजार रूपयांतून त्याने दोन हजार रूपयांचा फोन आणि आपल्या मुलीसाठी त्याने 1500 रूपयांचे पैंजण खरेदी केले. उर्वरित पैसे त्याने दारूवर खर्च केले, असेही पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मुखीच्या पत्नीचीही चौकशी केली. त्यांना आणखी एक मुलगा आहे. मुखी हा सफाई कर्मचारी आहे. त्याच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. त्यात त्याला दारूचे व्यसन आहे.
या प्रकरणात त्याचा मेहुणा बलिया आणि अंगणवाडी कर्मचारीही सामील आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अनुप साहू यांनी दिली.
सोमनाथ सेठी नावाच्या व्यक्तीला त्याने आपले मूल विकल्याची माहिती समोर आली आहे. सेठीच्या 24 वर्षांच्या मुलाचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूचा धक्का सेठी आणि त्याच्या पत्नीला बसला. या धक्क्यातून सावरण्यासाठी सेठी याने मुखीकडून 11 महिन्यांचे मूल विकत घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली.