कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे 29 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. 21 सप्टेंबरला महिलेचा मृतदेह रेफ्रिजरेटरमध्ये सापडला होता. आरोपींनी मृतदेहाचे 30 तुकडे करून फ्रीजमध्ये लपवून ठेवले होते. मात्र दुर्गंधी येऊ लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी महिलेच्या आई आणि भावाला फोन केला. त्यानंतर हत्येचे प्रकरण उघडकीस आले. या महिलेच्या हत्येत पश्चिम बंगालमधील रहिवासी असलेल्या अश्रफ नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचे पोलिसांना आता समोर आले आहे.
महिलेचा पतीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे अश्रफसोबत प्रेमसंबंध होते. कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपीची पश्चिम बंगालमध्ये ओळख पटली आहे. महिलेचा मृतदेह बेंगळुरू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आढळून आला. गृहमंत्र्यांनी सध्या कोणत्याही अटकेचा इन्कार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला बेंगळुरूच्या व्यालिकावल भागात भाड्याने राहत होती. घटनेची माहिती मिळताच पती घटनास्थळी आले. पतीने न्हाव्याचे काम करणाऱ्या अश्रफवर आरोप केले होते.
पत्नी 9 महिन्यांपासून वेगळी राहत होती
अश्रफचे उत्तराखंडशी असलेले कनेक्शनही समोर आले आहे. महिलेेेचा पतीसोबत 9 महिन्यांपासून वाद सुरू होता. त्यानंतर ती नाईच्या दुकानात काम करणाऱ्या अशरफच्या संपर्कात आली. महिनाभरापूर्वी पतीने तिला पाहिले होते. ती त्यांच्या मुलीला भेटायला त्याच्या दुकानात आली होती. अश्रफही तिला ब्लॅकमेल करत असल्याची भीती पतीला वाटत होती.
महिलेच्या हत्येनंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. महिलेच्या पतीचे म्हणणे आहे की, अश्रफच्या सांगण्यावरून पत्नीने त्याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तो बंगळुरूला गेला नाही. दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यानंतर दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. अश्रफ हा बेंगळुरूच्या नेलमंगला भागात एका न्हावीच्या दुकानात काम करायचा.