सिनेदिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला विरोध म्हणून लष्करातील क्षत्रिय समाजातील जवानांनी अन्नत्याग करावा, असे आवाहन करणी सेनेने केले आहे.
करणी सेनेचे प्रमुख महिपाल सिंह मकराना यांनी हे आवाहन केले आहे. सीमेवर देशाचे संरक्षण करणार्या जवानांनीही राणी पद्मावतीच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे. तुमच्या बहिणींचा सन्मान आणि इभ्रतीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हीही एका दिवसासाठी लष्करातील मेसच्या जेवणावर बहिष्कार टाकावा, असे आवाहन महिपाल सिंह मकराना यांनी केले आहे.
सरकार जर ऐकतच नसेल तर क्षत्रिय जवानांनी एका दिवसासाठी शस्त्र खाली ठेवावेत, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसुन्न जोशी यांनी हरयाणात पायही ठेवू नये, असा इशाराही त्यांनी दिला. राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह कालवी यांनीही मकराना यांच्या निर्णयाचे समर्थन केले. सिनेमागृहात हा चित्रपट दाखवला तर जनताच संचारबंदी लागू करेल, असे कालवी म्हणाले. 'पद्मावत' प्रदर्शित करण्याची परवानगी देणार्या, तसेच त्याचे समर्थन करणार्यांना जयपूरमध्ये प्रवेश देणार नाही, असेही सिंह यांनी म्हटले आहे.