गेल्या दहा वर्षांपासून भारतीयांना ज्या गोष्टींची प्रतिक्षा होती ती आता संपली आहे. कारण हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ या बोगद्याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या युद्धनीती विषयक धोरणाचा हा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा असून भारतीय (India) लष्कराला त्यामुळे पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे.
पीरपंजाल डोंगररांगांना भेदून ३,३०० कोटी रुपये खर्चून हा बोगदा बनवण्यात आला आहे. हा बोगदा जगातील सर्वाधिक उंचीवर (१०,०४० फूट) बनवण्यात आला आहे. या बोगद्याच्या लोकार्पणानंतर लाहौल येथील जनता आता थंडीच्या दिवसात हिमवृष्टी सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत जगापासून संपर्काविना राहणार नाही.
या बोगद्यामुळे चीनला लागून असलेल्या लडाख आणि पाकिस्तानला लागून असलेल्या कारगिलपर्यंत भारतीय सैन्याला सहज पोहचता येणार आहे. या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचं अंतर ४६ किमीने कमी होणार आहे. त्यामुळे केवळ दीड तासात मनाली ते केलांगपर्यंत पोहोचता येणार आहे. या बोगद्यामुळे या भागातील पर्यटनालाही गती मिळणार आहे.
बोगद्यात असणार ‘या’ सुविधा
या बोगद्यात (tunnel)प्रत्येक १५० मीटर अंतरावर टेलिफोनची सुविधा असेल. ६० मीटरवर हायड्रेंट, ५०० मीटरवर आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याचा मार्ग, प्रत्येक १ किमीवर हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. प्रत्येक त्याचबरोबर २५० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत.