Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल गांधींचं 'भारत जोडो' आणि गोव्यात भाजपाचं 'कॉंग्रेस तोडो'

rahul gandhi
, बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (20:22 IST)
एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या सशक्तीकरणासाठी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली तर गोव्यात काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र दिसत आहे. गोव्यातील 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
 
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचा देखील या आठ जणांमध्ये समावेश आहे. गोव्यात काँग्रेसचे 11 आमदार आहेत. त्यापैकी 8 जणांनी भाजप प्रवेश केला आहे.
 
मायकल लोबो, दिगंबर कामत, दियालया लोबो, राजेश फळदेसाई, रदाल्फ फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, संकल्प आमोणकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
 
गोव्यात भाजपचेच सरकार आहे. आता 8 जण भाजपमध्ये सामील झाल्यानंतर गोव्यातील भाजपचे सरकार अधिक बळकट होईल. 11 पैकी 8 जणांनी पक्ष बदलल्यामुळे या आमदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होणार नाही.
 
पक्षांतर बंदीची कारवाई टाळण्यासाठी पक्षातून बाहेर पडणाऱ्या आमदारांची संख्या 2/3 असणं आवश्यक आहे. त्यामुळे गोवा काँग्रेसचे 11 पैकी 8 आमदार फुटल्यामुळे ही कारवाई होणार नसल्याचे दिसत आहे.
 
मायकल लोबो या पक्षांतरावर म्हणाले की आम्ही लोकांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करतो. पक्षात खूप धुसफूस असल्यामुळे अनेक नेते सोडून येतील असं देखील लोबो म्हणाले.
कॉंग्रेसफुटीची ही चर्चा गेल्या काही काळापासून गोव्यात होतीच. ती राहुल गांधींच्या यात्रेचा मुहूर्त पाहून प्रत्यक्षात आली. प्रमोद सावंतांनी पक्षप्रवेशाच्या वेळेस म्हटलं, "आता 'कॉंग्रेस छोडो' यात्रा सुरु झाली आहे."
 
दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्यासमवेत लोबो यांच्या पत्नी दलिला लोबो, राजेश फालदेसाई, केदार नाईक, संकल्प अमोणकर, अलेक्सो सिक्वेरा आणि रुडोल्फ फर्नांडीस या आमदारांनी आज अधिकृतरित्या कॉंग्रेसला सोड्चिठ्ठी दिली. नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे 11 आमदार निवडून आले होते. आता पक्षाकडे तीनच आमदार शिल्लक राहिले आहेत.
 
'पुढच्या 6 महिन्यात अनेक नेते पक्ष सोडतील'
भाजपाने आज पणजीतल्या पक्षाच्या मुख्य कार्यालयात मोठी पत्रकार परिषद करत कॉंग्रेसच्या आठ आमदारांना पक्षप्रवेश दिला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांच्या पूर्ण रोख राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेकडेच होता.
 
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तर ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीचीच तयारी असल्याचं म्हटलं. "मी सगळ्यांचं भाजपात स्वागत करतो. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश जसा विकास करतो आहे ते पाहून सगळे आले आहेत. कॉंग्रेस 'भारत जोडो' यात्रा करते आहे, पण इथे 'कॉंग्रेस छोडो' यात्रा सुरु झाली आहे. यापेक्षाही अधिक लोक कॉंग्रेस सोडून भाजपात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी 'कॉंग्रेस जोडो' यात्रा सुरु केली पाहिजे. याचा परिणाम देशभर दिसेल आणि 2024 मध्ये आमचे अधिक खासदार निवडून आलेले दिसतील," असं सावंत म्हणाले.
 
दिगंबर कामतांनीही पक्षप्रवेशासाठी कार्यालयात जातांना पत्रकारांशी बोलतांना मोदींचं कौतुक करत आपण त्यांच्या कामाकडे पाहून भाजपात जात असल्याचं म्हटलं. विरोधी पक्षनेते मायकल लोबो वास्तविक निवडणुकीअगोदरच भाजपातून कॉंग्रेसमध्ये आले होते. आता पुन्हा त्याच पक्षात गेले. त्यांनी याचं खापर कॉंग्रेसमधल्या गोंधळावर फोडलं.
 
"गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल असे ज्येष्ठ नेते कॉंग्रेस सोडून गेले आहेत. एकेकाळी ते कॉंग्रेसचे मोठे नेते होते. त्यांनीही पक्षाला कृतीतून सांगितलं की 'भारत जोडो' यात्रेमुळं कॉंग्रेसची अवस्था सुधारणार नाही. जे प्रादेशिक नेतृत्व आहे, ते अधिक बळकट केलं पाहिजे. त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे 'भारत जोडो' यात्रा ही अयशस्वी होणार आहे. गोव्यातून जे सुरु झालं ते देशभरात तुम्हाला दिसेल अनेक जण कॉंग्रेस सोडणार आहेत. पुढच्या सहा महिन्यात आपण पाहाल की ज्यांनी कॉंग्रेस बळकट केली, ते नेते पक्ष सोडतील. पक्षामध्ये पुरता गोंधळ आहे," लोबो म्हणाले.
 
'एवढी वर्षं विरोधात राहणं कोणालाही शक्य नव्हतं'
गोव्यातले ज्येष्ठ राजकीय पत्रकार किशोर गावकर यांच्या मते कामतांसह कॉंग्रेसच्या कोणालाच अजून पाच वर्षं विरोधी बाकांवर बसायचं नव्हतं आणि कॉंग्रेसचं दिल्लीचं नेतृत्वनेही इथले प्रकार गांभीर्यानं घेतले नाहीत, त्यामुळे हे सगळं घडलं.
 
"2012 सालापासून कॉंग्रेस विरोधी पक्षात आहे. सत्तेबाहेर अजून पाच वर्षं राहणं त्यांना शक्य नव्हतं आणि त्यासाठी भाजपात जाणं याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. या सगळ्यांना एकत्र करण्यासाठी दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनीच पुढाकार घेतला होता. हे लक्षात आल्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची याचिकाही दाखल केली होती.
 
लोबोंना विरोधी पक्षनेतेपदावरुन हटवण्याचा ठरावही केला होता. तेव्हाच हे कधीतरी घडणार हे माहित होतं. ते केवळ दोन तृतीयांश बहुमताची वाट पाहत होते. कॉंग्रेस श्रेष्ठीही इथं राज्यात काय होतं आहे याबद्दल दुर्लक्ष करत होते. राहुल गांधी निवडणुकीनंतर इकडे आलेही नाहीत, " असं गावकर सांगतात.
 
गोव्यात कॉंग्रेस फुटणार हे निवडणुकांनंतर लगेचच बोललं जाऊ लागलं होतं. पण तरीही भाजपानं वाट पाहिली आणि 'भारत जोडो' यात्रेचा जणू मुहूर्त पाहून हे पक्षप्रवेश घडवून आणले असंही म्हटलं जातं आहे. "भाजपा सध्या येऊ इच्छिणा-या सगळ्याच विरोधकांना पक्षात घेत आहे. पण गोव्यात त्यांना वेळ साधायची होती. त्यानुसार 'भारत जोडो'ला त्यांनी बरोबर अपशकुन केला. तेच भाजपा सातत्यानं सकाळपासून बोलतं आहे," गावकर पुढे म्हणतात.
 
5 वर्षांत कॉंग्रेस 3 वेळा फुटली
कॉंग्रेसचं हे गोव्यातलं आजचं फुटणं जे काही पहिलं नाही. गेल्या पाच वर्षांत तर हा तीन वेळा फुटला आहे. 80 दशकापासून सतत सत्तेत राहिलेल्या या पक्षाची सत्तेशिवाय विखुरलेली अवस्था आहे. 2012 मध्ये दिगंबर कामत मुख्यमंत्री असतांनाच ते निवडणूक हरले.
 
त्यानंतर 2017 मध्ये ते सर्वात मोठा पक्ष बनले. पण नितीन गडकरी, मनोहर पर्रिकर यांच्या राजकीय डावपेचांमुळे कॉंग्रेसच फुटली. विश्वजीत राणेंचा एक गट बाहेर पडून भाजपात आला आणि भाजपाची पुन्हा सत्ता आली.
 
हे कमी की काय म्हणून 2019 मध्ये उरलेला कॉंग्रेस पक्षही फुटला. कॉंग्रेसचे 10 आमदार भाजपात आले. तेव्हा दिगंबर कामत पक्षातच राहिले, विरोधी पक्षनेते झाले. 2022 च्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस बहुमताचा दावा करत होती. कामतच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होते.
 
सततच्या पक्ष सोडण-यांना वैतागलेल्या कॉंग्रेसनं कामत आणि लोबो वगळता बाकी सगळे नवे चेहरे यंदाच्या निवडणुकीत दिले. त्यांच्याकडे पक्ष कधीही सोडणार नाही असं प्रतिज्ञापत्रही लिहून घेतलं. पण आता तेही सगळे कामत आणि लोबोंसहित फुटले.
 
गोव्याचं राजकारण गेली तीन दशकं पक्षांतरांनी आणि पक्षफुटींनी बनलं आहे. यंदाच्या निवडणुकीत तो मतदारांच्या रागाचा मुद्दा बनला होता. त्यामुळे त्यांनी बहुमतही एका पक्षाला दिले. पण तरीही पक्षांतरं चालूच आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Automatic Car Accident Viral Video :कार दुरुस्त करताना अपघात व्हिडीओ व्हायरल !