Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाईक रायडिंग करणाऱ्या स्पॅनिश तरुणीवर सामूहिक बलात्कार, तीन जण ताब्यात

rape
, रविवार, 3 मार्च 2024 (12:28 IST)
झारखंडमधील दुमका जिल्ह्यात एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. 1 मार्चच्या रात्री उशिरा या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला तसंच मारहाणीची घटना घडली होती.
 
ही घटना घडली तेव्हा ही महिला तिच्या पतीसोबत रस्त्याच्या कडेला असलेल्या तंबूत मुक्कामासाठी थांबली होती.
 
दुमकाचे पोलीस अधीक्षक पितांबर सिंह खेरवार यांनी बीबीसीशी बोलताना या घटनेला दुजोरा दिला आहे.  स्पॅनिश महिला आणि तिच्या पतीला पोलीस संरक्षणात दुमका इथं आणण्यात आलं आहे. जेणेकरून पुढील कार्यवाही करता येईल,असं ते म्हणाले.
 
खेरवार यांनी बीबीसीला सांगितलं, “शुक्रवारी रात्री हंसडीहा पोलीस स्टेशनचे गस्ती पथक कुरमाहाटमधून जात होते. तेव्हा या स्पॅनिश जोडप्यानं पोलीस पथकाला थांबवलं आणि त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. तेथील पोलिसांना त्यांची भाषा समजण्यात अडचण येत होती. असं असतानाही गस्ती पथकानं त्यांना जवळच्या रुग्णालयात नेलं. कारण ते जखमी झाले होते आणि त्यांना रक्तस्त्राव होत होता. सरैयाहाट येथील सरकारी आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले."
 
खेरवार पुढे म्हणाले, “आम्ही लगेच घटनास्थळी पोहोचलो आणि त्यांना विचारणा केली. तेव्हा सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि  घड्याळ आदी वस्तू लुटण्यात आल्याचं पीडितेनं सांगितलं. यावेळी त्यांना मारहाणही करण्यात आली."
 
खेरवार यांनी पुढे म्हटलं, “जोडप्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि आरोपीच्या चेहऱ्याचं स्वरुप लक्षात घेऊन आम्ही रात्रीच तिघांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली जात आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच पकडण्यात येईल. आम्ही आमच्याकडून स्पॅनिश दूतावासाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही, पण स्पेशल ब्रँचच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण बाब सांगितली आहे."
 
दुमकाच्या फुलो झानो मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे अधीक्षक अनुकुरण पूर्ती म्हणाले, "महिलेच्या जीवाला कोणताही धोका नाही. वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले आहे. बाहेरून जखमा दिसत आहेत. सध्या वैद्यकीय तपासणी सुरू आहे."
 
झारखंडचे मंत्री बाना गुप्ता यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "दोषींना कठोर  शिक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकार आपल्या बहिणींच्या पाठीशी उभे आहे." 
झारखंडचे मंत्री मिथलेश कुमार ठाकूर यांनीही पीटीआय या वृत्तसंस्थेला आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
ते म्हणाले, "ही निषेधार्ह घटना आहे आणि दोषींना सोडलं जाणार नाही. पोलीस योग्य कारवाई करत आहेत."
 
घटना कशी घडली?
एका स्थानिक पत्रकारानं बीबीसीला सांगितलं की, ही महिला आणि तिचा पती हंसडीहा मार्गे बिहारमधील भागलपूरला दोन वेगवेगळ्या बाईकवरून जात होते. रात्र झाल्यानं ते कुरमाहाट जवळ रस्त्याच्या कडेला तंबू टाकून थांबले. तेव्हा आजूबाजूचे काही तरुण तिथं पोहचले आणि ही घटना घडली. याबाबतची माहिती मिळताच दुमकाचे पोलीस अधीक्षक रात्रीच तिथं पोहोचले.
 
पीडित महिला आणि तिच्या पतीला सरैयाहाट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सकाळी दोघांनाही पोलीस संरक्षणात आपापल्या दुचाकीवरून दुमका इथं आणण्यात आलं.
 
तिथं त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या घटनेबाबत लिहून सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
 
काँग्रेस आणि भाजपच्या प्रतिक्रिया
काँग्रेस आमदार दीपिका पांडे सिंह यांनीही या घटनेचा निषेध केला असून आरोपींना तातडीनं अटक करण्याची मागणी केली आहे.
 
त्यांनी ट्विटरवर लिहिलंय की, “आमच्या राज्यात पर्यटनासाठी आलेल्या विदेशी महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना अत्यंत घृणास्पद आणि लज्जास्पद आहे. अशी घटना आमचं राज्य आणि समाज या दोघांवरही कलंक आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी माझी सरकारकडे मागणी आहे."
झारखंडमध्ये स्पॅनिश तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणावर भाजपनं प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी म्हणाले की, "विदेशी पर्यटकांसोबत अशा घटना घडल्या तर झारखंडमध्ये कोण येणार? अशा घटना रोखणं ही समाजाची आणि सरकारची जबाबदारी आहे. सरकारची जबाबदारी खूप जास्त आहे. अशा घटना करणाऱ्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की भविष्यात असं कृत्य करण्याचं धाडस कुणी करू नये."

Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकसभा : भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लढणार