रेल्वेमध्ये ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेला दिले आहेत. रेल्वे प्रवासात प्रवाशांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्रास झाला तर तत्काळ ऑक्सिजन पुरवता यावा म्हणून रेल्वेमध्ये ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यात यावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
प्रवास करताना आजारी असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली जावी म्हणून हा निर्णय मुख्य न्यायमूर्ती दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिला. ‘रेल्वेने प्रवास करत असलेल्या प्रवाशांना गरज पडली तर त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत ऑक्सिजन मिळावा म्हणून रेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर आवश्यक आहेत. जर एखाद्या प्रवाशाने त्याला वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे तिकीट तपासणीसाला सांगितल्यास पुढच्या स्टेशनवर प्रवाशाला आवश्यक त्या वैद्यकीय सेवा पुरवणे हे त्यांचे कर्तव्य आहे.’, असे खंडपीठाने म्हटले आहे.