देशाच्या सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याची मागणी करत काँग्रेससह सात पक्षांचे खासदार एकत्र आले आहेत. सरन्यायाधीशांविरोधात महाभियोगाच्या प्रस्तावावर एकूण ७१ खासदारांच्या सह्या आहेत. हे पत्र देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
सरन्याधीशांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणावा अशी मागणी करत ७१ खासदारांनी सह्या केल्या. त्यापैकी ७ निवृत्त झाले आहेत, त्यामुळे आमची संख्या ६४ झाली आहे. मात्र महाभियोगाचा प्रस्ताव आणण्यासाठी हा आकडा पुरेसा आहे. आम्हाला खात्री आहे की माननीय सभापती नक्कीच त्यावर निर्णय घेतील, असा विश्वास आझाद यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी विरोधकांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याभेट घेऊन मिश्रा यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव सादर केला आहे. सरन्यायाधीशपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.