सूरीनाम देशाचे राष्ट्रपती चंद्रिकाप्रसाद संतोखी हे येत्या 26 जानेवारीला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मूळ भारतीय वंशाचे असलेले संतोखी राजपथ संचलनामध्ये सहभागी होऊ शकतात, असे पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित सूत्रांनी माहिती देताना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 व्या अनिवासी भारतीय दिन संमेलनाला डिजिटल माध्यमाद्वारे संबोधित केले. या संमेलनात सूरीनामचे राष्ट्रपती संतोखी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
खरेतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार होते. मात्र ब्रिटनमध्ये नव स्ट्रेनचा उद्रेक झाल्याचे पाहून त्यांनी आपला भारतदौरा रद्द केला होता. यानंतर भारत सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या संचलन कार्यक्रमासाठी संतोखी यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.