उत्तर प्रदेश पोलिसांनी कुंभमेळ्यासाठी आधीपासूनच काही नियम तयार केले असून ते पाळण्यासाठी उपस्थितांना आवाहन करण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना पोलिस महानिरीक्षक ओ.पी सिंह म्हणाले, कुंभमेळ्यादरम्यान गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमात स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. लाखो यात्रेकरुंना या संगमात स्नान करण्यासाठी येतात. त्यामुळेच या संगमात डुबकी मारण्यासाठी ४१ सेकंदांची वेळ नक्की करण्यात आली आहे. याहून जास्त वेळ कोणीही या नदीमध्ये स्नान करु शकणार नाही. त्या लोकांना ४१ सेकंदामध्ये त्वरीत बाहेर काढले जाणार आहे. हा कुंभमेळा सुरक्षितपणे कोणत्याही अपघाताविना पार पडावा यासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. याशिवायही ट्रॅफीकच्यादृष्टीनेही काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हा सर्व सोहळा योग्य पद्धतीने पार पडावा यासाठी पोलिस आणि इतर यंत्रणा अतिशय काटेकोर प्रयत्न करत असून वेळप्रसंगी इतर राज्यातील पोलिसांचीही मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.