उत्तर प्रदेशमधील पीलीभीत येथे एका शेतकऱ्याने एक हजार किलो फ्लॉवर रस्तावर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. योग्य भाव न मिळाल्याने संतापाच्या भरात मोहम्मद सलीम नावाच्या शेतकर्याने सर्व फ्लॉवर रस्त्यावर टाकले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हा प्रकार घडला असून गरजू व्यक्तींनी फ्लॉवर गोळा करुन वापरावे या उद्देशाने आपण फ्लॉवर फेकल्याचं हा शेतकरी म्हणाला.
त्याच्या फ्लॉवरसाठी व्यापाऱ्यांनी सांगितलेला एक रुपये किलो दर हा त्यानुसार माल बाजार समितीमध्ये आणण्यासाठी केलेल्या खर्चापेक्षाही कमी होता. सध्या बाजारात फ्लॉवरची किंमत १२ ते १४ रुपये किलो असून किलोमागे किमान आठ रुपये मिळावे अशी अपेक्षा असताना व्यापार्यांनी एक रुपया किलोने विकत घेण्याची तयारी दाखवली तेव्हा त्याला हा शेतमाल फेकून देण्याशिवाय कोणता पर्याय हाती शिल्लक नव्हता, असे त्याने सांगितले. परत पैसे खर्च करुन माल घरी आणाणे अधिक महागात पडलं असल्याचं तो म्हणाला.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्याने सांगितले की फ्लॉवरला भाव न मिळाल्याने जो तोटा झाला आहे त्यामुळे माझे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलीय. तो म्हणालाकी माझ्या अर्धा एकर शेतजमीनीत फ्लॉवरचं बियाणं, उत्पादन, खतं यासर्वासाठी आठ हजार रुपये खर्च आला तसेच हा माल बाजारात आणण्यासाठी चार हजार खर्च आला. आता पुढील पिकासाठी सावकाराकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावं लागणार असल्याचं त्याने म्हटलं.