दक्षिण आफ्रिकेहून 8,405 किलोमीटरचा प्रवास करून 5 नर आणि 3 मादी असे एकूण 8 चित्ते भारतभूमीवर दाखल झाले आहेत. नामबियाहून स्पेशल चार्टर्ड कार्गो फ्लाईटनं या चित्त्यांना भारतात आणलं गेलंय. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील भारतीय हवाई दलाच्या तळावर हे फ्लाईट उतरवण्यात आलं.
इथून मध्य प्रदेशातल्याच कुनो नॅशनल पार्कमध्ये पहिल्या 8 चित्त्यांना वसवण्यात येईल. चित्त्यांना शिकार करता येतील अशी काळविटं आणि रानडुक्करं या नॅशनल पार्कमध्ये मोठ्या संख्येने आहेत.
यासोबतच राजस्थानातील मुकंदरा डोंगर भागातला अधिवास चित्त्यांसाठी योग्य असल्याचं वन्यजीव तज्ज्ञांचं मत आहे.
देशातून चित्ता नामशेष झाला त्याला 50 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला होता.
"अखेरीस आता आपल्याकडे चित्त्यांसाठी आवश्यक अधिवास आणि गरजेच्या इतर गोष्टी आहेत," वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डीन यादवेंद्र देव झाला सांगतात. चित्ता भारतामध्ये आणण्याची जबाबदारी असणाऱ्या तज्ज्ञांपैकी ते एक आहेत.
संवर्धनासाठी एक मोठ्या मांसाहारी प्राण्याचं एका खंडातून दुसऱ्या खंडात स्थलांतर करण्यात येण्याची ही पहिली घटना असल्याचं ते सांगतात.
अंगावर काठे ठिपके असणारा सडपातळ बांध्याचा चित्ता भक्ष्य पकडण्यासाठी माळरानावर ताशी 112 किलोमीटर्स पर्यंतच्या वेगाने सुसाट धावू शकतो. चपळ शरीरयष्टीच्या चित्त्याचं वैशिष्ट्यं म्हणजे शिकारीसाठी हल्ला करताना तो सुसाट पळतो, पण अचानक थांबू शकतो, दबा धरून नंतर झेप घेतो.
जगातल्या एकूण 7,000 चित्त्यांपैकी बहुतेक दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि बोट्स्वानात आढळतात. भारतामध्ये 1900 सालापासून पुढे चित्त्यांची संख्या कमी होऊ लागली आणि चित्ता दिसल्याची शेवटची नोंद 1967-68 मध्ये झाली होती.
मध्य प्रदेश आणि राजस्थानातील एक नॅशनल पार्क आणि 2 अभयारण्यांना चित्ता पुन्हा आणून वसवण्यासाठी निवडण्यात आल्याचं डॉ. झाला सांगतात.
भारतातून कसा नामशेष झाला चित्ता
16व्या शतकात मुघल बादशाह जहांगीर यांच्या काळात जगात पहिल्यांदाच चित्ता पाळण्यात आला. आपल्या काळात एकूण 10,000 चित्ते होते आणि त्यापैकी 1000 आपल्या दरबारात होते, अशी नोंद जहांगीर यांचे वडील अकबर यांनी केली आहे.
20व्या शतकात हे प्राणी शिकारीसाठी आयात करण्यात आले. 1799 ते 1968 या कालावधी भारतातल्या जंगलात किमान 230 चित्ते होते असं संशोधनातून समोर आलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतातून नामशेष होणारा हा एकमेव मोठा सस्तन प्राणी आहे.
शिकार, कमी होणारे अधिवास आणि काळवीटं, सांबर आणि ससे यांची संख्या रोडावल्यामध्ये दुर्मिळ झालेलं भक्ष्य या सगळ्या कारणांमुळे चित्ता भारतातून नामशेष झाला.
चित्त्यांनी गावांमध्ये शिरुन पाळलेली जनावरं मारायला सुरुवात केल्याने ब्रिटीशांच्या काळामध्ये तर बक्षीस लावून चित्त्यांची शिकार करण्यात आली.
1950च्या दशकाच्या मध्यापासूनच चित्ता पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 1970च्या दशकातही इराणमधून चित्ता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या काळी इराणमध्ये 300 चित्ते होते. पण नेमकं त्याचवेळी इराणच्या शाहची सत्ता उलथवण्यात आली आणि ही बोलणी बारगळली.
एखाद्या प्राण्याला अधिवासात पुन्हा वसवण्यात कायमच काही धोके असतात. पण असं करता येणं दुर्मिळ नाही. 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात मलावीमधून चित्ते नामशेष झाले होते. 2017मध्ये मलावीमध्ये चार चित्ते पुन्हा वसवण्यात आले. आता इथल्या चित्त्यांची संख्या वाढून 24 झाली आहे.
या प्रयत्नांसाठीची चांगली बाजू म्हणजे चित्ता हा प्राणी आजूबाजूच्या परिस्थिशीची लवकर जुळवून घेणारा असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
जगातल्या एकूण चित्त्यांपैकी 60 चित्ते आफ्रिकेच्या दक्षिण भागात आहेत. इथल्या वाळवंटांमध्ये, रेताड जंगलांमध्ये, कुरणांमध्ये, घनदाट अरण्यांमध्ये आणि डोंगरांमध्ये ते राहतात.
उणे 15 डिग्री सेल्शियस तापमान्याच्या नॉर्दर्न केपमध्येही चित्ते आढळतात आणि पारा 45 डिग्रींपर्यंत जाणाऱ्या मलावीमध्येही चित्ते राहतात.
"जोपर्यंत पुरेसं भक्ष्यं आहे, तो पर्यंत अधिकास काय आहे, याची अडचण येत नाही. सिंह, बिबटे, तरस, जंगली कुत्रे असे शिकार करणारे जास्त प्राणी असणाऱ्या वातावरणातही ते टिकतात आणि प्रजोत्पादनही करतात," दक्षिण आफ्रिकेत चित्त्यांच्या संवर्धनाचं काम करणाऱ्या विन्सेंट वॅन डर मेरवे यांनी सांगितलं.
पण काळजी करण्याजोग्या इतरही काही बाबी आहेत. चित्ते अनेकदा शेतजमिनींमध्ये घुसून पाळीव प्राण्याची शिकार करतात आणि त्यामुळे मानव - प्राणी संघर्ष निर्माण होतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही इतर प्राणी चित्त्यांची शिकार करतात.
"हा प्राणी नाजूक आहे. ते वेगवान आहेत आणि संघर्ष टाळतात," डॉ. झाला सांगतात.
दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जंगली चित्त्यांच्या मृत्यूंपैकी अर्धे हे सिंह आणि तरसांनी शिकार केल्याने होतात. अगदी जंगली कुत्र्यांच्या टोळीने चित्त्यांवर हल्ला केल्याचं पाहण्यात आलंय.
"चित्ता मार्जार कुटुंबातल्या इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा वेगाने धावू शकतो. पण अनेकदा त्यांना स्वतः केलेल्या शिकारीचं संरक्षण करता येत नाही आणि कोणीतरी ती पळवून नेतं. अनेकदा त्यांची पिल्लंही सिंहासारखे प्राणी घेऊन जातात," वन्यजीव इतिहासतज्ज्ञ महेश रंगराजन सांगतात.
म्हणूनच कुंपण असणाऱ्या संरक्षित जागेमध्ये चित्ते जास्त चांगले जगत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. "कुंपण नसलेल्या जागांमधील चित्त्यांची लोकसंख्या अधिवास नष्ट झाल्याने आणि चित्त्यांचीच इतर प्राण्यांनी शिकार केल्याने कमी झाली. भारतातल्या अनेक जागा संरक्षित असल्या तरी त्यांना कुंपण नाही. त्यामुळे माणूस - जंगली प्राणी संघर्ष होऊ शकतो," विन्सेंट वॅन डर मेरवे सांगतात.
भारतातले कोणते भाग चित्त्यांचा अधिवास आणि पुनरुत्पादनासाठी योग्य आहेत, हे तपासण्यासाठी मेरवे यांनी एप्रिल महिन्यात भारत दौरा केला. कुनो नॅशनल पार्कची जागा चित्त्याचा अधिवास म्हणून योग्य असल्याचं त्यांना आढळलं. 730 चौरस किलोमीटर्सच्या या नॅशनल पार्कमध्ये घनदाट जंगल आणि माळरानंही आहेत. दक्षिण आप्रिकेत चित्ते राहतात त्या जागेशी याचं साधर्म्य आहे. इथे सिंह नसले तरी बिबटे धोकादायक ठरू शकतात.
मुकुंदरा डोंगरांमधलं कुंपण असणारं वाघांसाठीचं वनक्षेत्र, हल्ला करू शकणाऱ्या प्राणांची संख्या कमी असल्याने चित्त्यांसाठी अधिक चांगला अधिवास ठरण्याची शक्यता असल्याचं मेरवे सांगतात. "इथे खात्रीने यश मिळेल असं मला वाटतं. इथे चित्त्यांचं प्रजोत्पादन करता येईल आणि मग इथल्या अधिकच्या चित्त्यांच्या मदतीने इतर भागांमधली चित्त्यांची संख्या वाढवता येईल," ते सांगतात.
पण भारतातल्या संवर्धन तज्ज्ञांना ही कल्पना फारशी पटलेली नाही.
त्यांच्यामध्ये चित्त्यांना मोठ्या - 5 ते 10 हजार चौरस किलोमीटरच्या जागेची गरज असल्याचं ते म्हणतात.
भारतातले आघाडीचे संवर्धन तज्ज्ञ डॉ. के. उल्हास कारंथ यांच्यामते, "या अधिवासात मनुष्य, कुत्रे, बिबटे वा वाघ नसावेत. आणि चित्त्यांसाठी पुरेसं भक्ष्य असावं"
"जंगलामध्ये चित्त्यांचं पुरेशा संख्येत प्रजोत्पादन करणं हे चित्ता पुन्हा आणण्यामागचं उद्दिष्टं असायला हवं. नॅशनल पार्कमध्ये फक्त काही प्राणी आणून सोडणं पुरणार नाही. हा प्रकल्प फारसा टिकणार नाही," ते म्हणतात.
पण भारतामध्ये चित्ता परत आणण्याच्या या मोहीमेबद्दल डॉ. झालांसारख्या अनेक तज्ज्ञांना आशा आहे. "एखादा प्राणी परिसंस्थेत पुन्हा आणण्यासाठी किमान 20 प्राण्यांची गरज असते. पुढच्या 5 वर्षांमध्ये परदेशातून 40 चित्ते भारतात आणण्याचं आमचं उद्दिष्ट आहे."