नवी दिल्ली- काश्मीरमधील निदर्शने आणि हिंसाचारात ज्या लोकांचा बळी गेला आहे ते काही कुणी परके नव्हते. ते आपलेच, आपल्या देशाचा एक भाग होते, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करताना व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुरक्षादलाचे जवान असोत, पोलीस असोत वा युवक असोत. कोणाचाही मृत्यू होणे ही आमच्यासाठी चिंतेची बाब असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. जम्मू-काश्मीरमधील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना पंतप्रधानांनी सरकार याप्रश्नी गंभीर असल्याचे स्पष्ट केले. काश्मीरमध्ये सध्या जो तणाव आहे तो चिंतेचा विषय आहे. त्यावर घटनेच्या चौकटीत राहून चर्चा करण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी यांनी म्हटले.
दरम्यान शिष्टमंडळाने पंतप्रधानांना निवेदन सादर करून काश्मीरमधील पेलेट गनचा वापर तत्काळ थांबवण्यात यावा, अशी विनंती केली. काश्मीरमधील स्थिती दिवसेंदिवस अधिक चिघळत चालली असून त्याकडे तातडीने लक्ष न दिल्यास लोकांमध्ये वेगळेपणाची भावना बळावेल, अशी भीतीही शिष्टमंडळाने यावेळी व्यक्त केली. उमर यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी. ए. मीर, कम्युनिस्ट पक्षाचे आमदार एम. वाय. तारीगामी व अन्य नेते शिष्टमंडळात होते.