Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माहूरगड - श्री रेणुका देवी

माहूरगड - श्री रेणुका देवी
, बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (09:55 IST)
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. माहूर गडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी आहे. ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. माहूर गड हे एक जागृत तीर्थ क्षेत्र आहे. माहूर गडावर रेणुके तसेच दत्तात्रय आणि परशुराम यांची देखील देऊळे इथे आहे. या देवीचं देऊळ यादव काळातील राजाने बांधले असे. आख्यायिका आहे की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूर गडावर झाला.
 
माता रेणुकाची एक कथा आहे- या कथेनुसार रेणुका मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजे परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केले. नंतर परशुरामाला आपल्या  मातेची आठवण येऊ लागली ते दुखी झाले असून शोकाकुल झाले होते. त्याच क्षणी आकाशवाणी झाली. तुझी आई तुला दर्शनास येईल. पण तू मागे वळून बघू नकोस. परंतु परशुरामाला आपल्या आईशी भेटण्याची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने मागे वळून बघितले. त्यावेळी रेणुकेमातेचा चेहराच जमिनीतून वर आलेला होता. परशुरामाला तेवढेच दिसले. त्यामुळे माहूरगडावर रेणुकेच्या या तांदळारूपातील मुखाचीच पूजा केली जाते. या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले त्यामुळे या डोंगराला 'मातापूर ' म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्रप्रदेशातील 'ऊर' गाव असल्यामुळे 'माऊर' आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाते. 
 
एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज नगराच्या राजाच्या पोटी जन्म घेतला तिचे नाव रेणू ठेवले. उपवर झाल्यावर तिचे लग्न शंकराचे अवतार मानले गेलेले ऋषी जमदग्नीशी करण्यात आले. ऋषी जमदग्नी हे फार तापट असे. ऋषींच्या आश्रमात फार शिष्य शिकवणी घेण्यासाठी राहत असे. ऋषींच्या आश्रमात कामधेनू नावाची गाय होती जी सर्वांची इच्छा पूर्ण करायची. एकदा त्या नगराचा राजा सहस्रार्जुनाने कामधेनू बघितल्यावर ऋषींकडे तिची मागणी केली. ऋषीने नकार दिला या वर संतापून त्याने ऋषिपुत्र परशुराम नसताना आश्रमावर हल्ला करून ऋषी जमदग्नि यांना ठार मारले. ऋषिपुत्र परशुराम तेथे आल्यावर घडलेला प्रकार कळाला. त्याच क्षणी त्यांनी सर्व क्षत्रियांना संपविण्याची प्रतिज्ञा घेतली आणि वडिलांचे अंत्यसंस्कार कोऱ्या जमिनीवर करण्याचे निश्चय करून वडिलांचे प्रेत घेऊन आई सह भटकंती करत माहूर गडावर आले. इथे पूर्वीपासून वास्तव्यास असलेले दत्तात्रयांनी त्यांना मदत केली आणि वडिलांसाठी कोरी जागा शोधून दिली. त्यापूर्वी परशुरामाने आपल्या बाणाने तिथे मातृ कुंड आणि सर्व कुंड निर्माण करून त्याच पाण्याने अंघोळ घालून आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले. त्यांचा पित्यासह त्यांची माता रेणू देखील सती झाल्या.
 
या माहूर गडावर माता रेणुकेचे कमलाकर असे देऊळ आहे. हे देऊळ यादवराजा देवगिरी यांनी 800 ते 900 पूर्वी बांधलेले असे. हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आले आहेत. देऊळ हे गाभारा आणि सभामंडपात विभागलेले आहेत. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश देत नाही. गाभाऱ्याचे प्रवेश द्वार चांदीच्या पत्राचे आहे. 
 
देवीचा मुखवटा तब्बल 5 फुटी उंच आहे आणि रुंदी 4 फुटी इतकी आहे. जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा तेवलेला आहे. देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुखी आहे. 
 
देवी आईने डोक्यावर चांदीचा टोप घातलेला आहे. सुवर्णेभूषणे परिधान करून देवी पितांबर नेसलेली आहे. भाळी मळवट भरलेले असून मुखात तांबूल घेऊन आहे. मुखावर सहस्त्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुकेचे मोहक रूप डोळ्यातच साचवून ठेवण्या सारखे असते.
 
मातेचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला दक्षिणाभिमुख चांदीने मढलेल्या दारातून प्रवेश करावा लागतो. रेणुके मातेच्या विविध पूजा, मंत्रोच्चाराने साऱ्या गाभाऱ्यात एक चैतन्य आणि पावित्र्य वातावरण निर्माण होते. सभामंडपाच्या परिसरात महाकाली, महालक्ष्मी आणि तुळजाभवानीच्या मुरत्या आहेत. पहिलं बाजूस परशुरामाचे देऊळ दर्शनी भागास गणपतीचे देऊळ, विष्णू कवी मठ, पांडवतीर्थ, औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृत कुंड, आत्मबोध तीर्थ, मातृ तीर्थ आणि राम तीर्थ इत्यादी तीर्थ आहेत.
 
शारदीय नवरात्र हे माहूरगडावर शुचिर्भूत वातावरणात आणि श्रद्धेने साजरा करतात. नऊ दिवस या गडावर भाविकांची गर्दी उसळून येते. नवरात्रात घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्या पर्यंत दर रोजचा पायस नैवेद्य म्हणजे दहीभात, पुरणपोळी दाखवतात. ललितापंचमीला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले जातात. महापूजा आणि महाआरती केल्यावर भाविकांना प्रसाद देतात. जागरण गोंधळ करून रेणुकेचा उदो-उदो केला जातो. माहूर गडावर कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, शाकंभरी नवरात्र, चंपाषष्ठी, मकरसंक्रांत, होळी इत्यादी सर्व सण साजरे केले जातात. इथे मातृतीर्थ, वनदेव, कैलासटेकडी, 
 
वसंत विष्णुकवी मठ, झम्पटनाथ देऊळ, भगवान परशुरामाचे देऊळ, महाकाली देऊळ, श्री दत्तशिखर, माता अनुसया देऊळ, सती सयामाय देऊळ, सर्वतीर्थ, देवदेवेश्वर, दर्गाह शेख फरिदबाबा आणि सोनापीर बाबा दर्गाह इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत. 
 
इथे पुरातन असे संग्रहालय देखील आहे. या संग्रहालयात पुरानी नाणी, शास्त्र, प्राण्यांचे सांगाडे, प्राचीन वेगवेळी दगडी, धातूच्या मुरत्या, आणि हस्तशिल्प जपून ठेवलेले आहेत.
 
कसं जाता येईल - 
इथे जाण्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड, किनवट, यवतमाळ आणि पुसद येथून महाराष्ट्राच्या राज्य परिवहनच्या बसेस आहेत. मुंबई वरून जाण्यासाठी रेल्वेने शेगावपर्यंत यायचे नंतर बस किंवा टॅक्सीने माहूर जायचे. पुण्यातून निघण्यासाठी पुणे अमरावती रेल्वेने वाशीमला उतरून बस किंवा टॅक्सीने जाता येतं. इथे भाविकांना राहण्यासाठी सोय आहेत. लॉज, हॉटेल, शासकीय विश्राम गृहे, भक्त निवास देखील उपलब्ध आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरात्र विशेष : उपवासाची पुरी त्वरित बनवा फक्त या सोप्या पद्धतीने