शाओमी आज (17 जुलै) रेडमी के 20 आणि रेडमी के 20 प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यासोबतच एक स्पेशल व्हेरिअंटही लाँच करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्पेशल व्हेरिअंटची किंमत तब्बल 4.8 लाख रुपये असेल, असं शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनू जैन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
गेले अनेक दिवसांपासून यूजर्स शाओमीच्या के सीरीजची वाट पाहत आहेत. पण शाओमी आता के सीरीजसोबत यूजर्सला उद्या मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. मनू जैन यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये एक फोटोही पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये गोल्ड फिनिशचा नवीन व्हेरिअंट दिसत आहे आणि त्यावर डायमंडमध्ये के लोगो आहे. तसेच पोस्टमध्ये 4.8 लाख रुपये किंमतही दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर शाओमीच्या या स्पेशल व्हेरिअंटबद्दल अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
हे दोन्ही फोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. रेडमी के 20 प्रोमध्ये 6.39 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर आणि अँड्रॉईड 9 पाय सिस्टम यामध्ये आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा (48MP+13MP+8MP) सेटअप आणि सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला असून 8 जीबी रॅमही दिली आहे.
दोन्ही फोनमध्ये 4000mAh बॅटरी क्षमता दिलेली आहे. रेडमी के 20 च्या स्पेसिफिकेशन आणि डिझाईन प्रो व्हेरिअंट प्रमाणे आहेत. पण प्रोसेसर, रॅममध्ये बदल आहे. रेडमी के 20 मध्ये स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसरसह 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोअरेज दिला आहे. तसेच या फोनची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते.