पॅरिस ऑलिम्पिक 2024 या क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. या जागतिक स्पर्धेत भारताचे 117 खेळाडू सहभागी होत असून ते आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आणि सात पदके जिंकली. यावेळी भारतीय खेळाडूंचे लक्ष्य पदकांची संख्या दुहेरी अंकावर नेण्याचे असेल.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) 117 खेळाडूंचा संघ पॅरिसला पाठवला आहे. यापैकी 70 खेळाडू पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. 47 भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये एक किंवा अधिक वेळा भाग घेतला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा, मीराबाई चानू, लोव्हलिना आणि पीव्ही सिंधू यांच्याकडून पुन्हा एकदा पदकांची अपेक्षा आहे.
भारताने आत्तापर्यंत एकूण 35 पदके जिंकली आहेत. यामध्ये 10 सुवर्ण, नऊ रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. 2020 टोकियो ऑलिंपिक भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे होते, ज्यामध्ये देशाने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण सात पदके जिंकली.
टोकियो ऑलिम्पिक2020 मध्ये भारताने एकूण सात पदके जिंकली. ऑलिम्पिकच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. नीरज चोप्राने 13 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी 2008 मध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले होते. अभिनवनंतर वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा दुसरा खेळाडू आहे.
खेळाडूंना आपल्या खेळाचा दर्जा उंचवावा लागणार आहे. या खेळाडूंमध्ये बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, टेनिसपटू रोहन बोपण्णा, टेबल टेनिस दिग्गज शरथ कमल आणि हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेश यांचाही समावेश आहे.