Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभ्यासाचे हवे नियोजन!

अभ्यासाचे हवे नियोजन!
, मंगळवार, 12 मार्च 2019 (15:23 IST)
अनेक विद्यार्थ्यांकडे अभ्यासाचे नियोजन नसल्याने ते ऐनवेळी ढेपाळतात. परीक्षेत नापास होतात.
 
त्यामुळे ते तणावात जगतात. त्यासाठी अभ्यास कसा करावा याच्या काही टिप्स...
विद्यार्थ्यांना तणावमुकत परीक्षा देण्यासाठी नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यास कसा करावा ही कला अवगत करून घेतली पाहिजे. यातच विद्यार्थ्यांचे हित अवलंबून असते.
 
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात यशवंत होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे शास्त्र आत्मसात केले पाहिजे. केवळ उद्या परीक्षा म्हणून आदल्या दिवशी रात्रभर अभ्यास करून चालणार नाही. तर वर्षभर प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करून नियमित अभ्यास केला पाहिजे.
 
मी खूप हुशार आहे असे म्हणून यश प्राप्त होत नाही, तर त्यासाठी रोज अभ्यास करावा लागतो, याची जाणीव विद्यर्थ्यांना करून दिली पाहिजे. आजचे युग हे वैज्ञानिक व स्पर्धेचे आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचा आशय समजून घेऊन उत्तप्रकारे अभ्यास करणे गरजेचे आहे.
 
दररोज चार तास अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यर्थ्यांना दररोज अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून अभ्यास करावा लागेल. अभ्यासाचा खरा 'आत्मा' वाचन असते. पुस्तकाचे वाचन करण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी अवांतर पुस्तकेसुद्धा वाचली पाहिजेत. दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी मोठ्याने प्रकट वाचन करावे. वाचनामुळे आपले विचार अगदी निर्भीडपणे आपण मांडू अथवा लिहू शकतो. असे वेळापत्रक तयार केल्याने दररोज अभ्यासाची उजळणी होते. अभ्यासाची चांगल्या मित्रांबरोबर चर्चा केल्याने त्यात स्वतःचे हित होते.
 
अभ्यासाबरोबर नियमित लिखाण करणे गरजेचे आहे. यामुळे बोटावरती जास्त ताण पडत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या आवडीचा योग्य आहार खाणे आवश्यक आहे. अकस्मात आहारामध्ये बदल करू नये. आपण कितीही सुज्ञान झालो तरी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांच्या आज्ञेत राहिले पाहिजे. त्यांचा आदर राखावा. केवळ पास होण्यापुरते ज्ञान नसावे, तर ते ज्ञान मिळवून त्या ज्ञानाचा दुसर्‍यांना वापर झाला पाहिजे. येणार्‍या संकटांना सामोरे गेले पाहिजे, असा आत्मविश्वास स्वतःच निर्माण केला पाहिजे. वात्रट मुलांच्या नादी न लागता त्यांच्यापासून चार हात दूर राहावे. स्वतःला स्वतःची शिस्त लावून घेतली पाहिजे. विचार मोठे ठेवले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढून आत्मविश्वास निर्माण होतो. याचा परिणाम विद्यार्थी उज्जवल यश संपादन करून यशवंत होऊ शकतात.
 
मागील पंधरा वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या हातात असणार्‍या पुस्तकाची जागा मोबाइल सम्राटाने घेतली आणि त्यापासून हळूहळू पुस्तकांच्या वाचनाकडे दुर्लक्ष होऊन त्याची जागा व्हॉट्‌सअ‍ॅपने घेतली आहे. व्हॉट्‌सअ‍ॅपमुळे काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, तर काही विद्यार्थी मनोरुग्णझालेले आढळले आहेत. इतकी पकड मोबाइलने केली आहे. सध्या तर तीन महिन्यांसाठी 400 रुपयांमध्ये प्रत्येक दिवशी दीड जीबी डेटा मोफत व कितीही बोलता येते. कदाचित ही सेवा स्वस्त वाटत असली तरी त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडू लागले आहे. हे मुलांनी टाळले पाहिजे. नंतर, आई-वडिलांना दोष देण्यापेक्षा याचे दुष्परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. ज्या विद्यार्थ्यांनी आई-वडील व गुरुजनांचा आदर केला ते विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यासाच्या मागे लागून आज आरामदायी जीवन जगत आहेत. तर ज्यांनी अभ्यासाकडे पाठ फिरवली ते आज व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यकाळासाठी शिक्षण खूप उपयोगी आहे.
 
थोडक्यात, विविध विषयांचे ज्ञान, झोपणे, मस्ती करणे, खेळणे, वृत्तपत्राचे वाचन, टी.व्ही. बघणे, अवांतर पुस्तकांचे वाचन, शाळेत येण्या-जाण्याला लागणारा वेळ आणि शाळेची वेळ अशा बाबींचा अंतर्भाव करून दिवसाचे नियोजन केल्यास विद्यार्थी तणावमुक्त होऊन परीक्षेसाठी सज्ज राहू शकेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे शास्त्र जाणून घेतले पाहिजे. तरच तो विद्यार्थी यशवंत होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जुन्या कपड्यांचा पुनर्वापर