अनधिकृत आधारकार्ड सेवा केंद्रात आधारकार्डात बदल करून बनावट कागदपत्र बनवून देण्याचा आरोपाखाली चौघांना अटक करण्यात आली असून बनावट कागदपत्र बनवण्याचा प्रकार पिंपरीत उघडकीस आला आहे.
पिंपरी -चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने पुणे -नाशिक महामार्गावर भोसरी या ठिकाणी या प्रकाराचा पर्दाफाश केला असून चार जणांना अटक केली आहे.
शिवराज प्रकाश चांभारे -कांबळे(40), स्वाती शिवराज चांभारे-कांबळे(36) या दांपत्याचे कृष्णा झेरॉक्स व स्टेशनरी असे नावाचे दुकान आहे. त्यांनी या दुकानात अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्र असल्याचे भासवले आणि ग्राहकांना बनावट कागदपत्रे बनवून दिली. तसेच यांनी विविध शासकीय कागदपत्रांमध्ये देखील अनधिकृतपणे बदल केले या प्रकारात त्यांच्यासह दुकानावर काम करणारे दोघे जण शामिल होते.
हे कागदपत्रे बनावटी असल्याचे समजल्यावर पिंपरी -चिंचवड दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकत पर्दाफाश केला आणि कांबळे दांपत्यासह इतर दोघांवर आधार कायद्यानुसार नागरिकांना फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.