पुण्यात बेड मिळत नसल्यानं एका करोनाबाधित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वारजे भागातील एका महिलेला करोनाचा संसर्ग झाला होता. महिला उपचारासाठी शहरातील अनेक रूग्णालयात फिरली. मात्र, तिला कुठेही जागा मिळाली नाही. त्या नैराश्यातून अखेर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या महिलेची सुसाईड नोट सापडली असून, मी आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं त्यात म्हटलेलं आहे.
वारजे भागात एक महिलेला करोना झाला होता. तिला खूप त्रास होऊ लागल्याने तिने १२ एप्रिल रोजी पतीसोबत दिवसभर शहरातील अनेक रूग्णालयात जाऊन बेड मिळण्यासाठी प्रयत्न केला. मात्र काही केल्या त्यांना बेड मिळाला नाही. त्याच दरम्यान तिला खूप त्रास होऊ लागला. त्यात या महिलेला दुसरा आजार देखील होता. त्यामुळे ती अस्वस्थ झाली. सोमवारी रात्री जेवण झाल्यावर ती बेडरूममध्ये गेली. पण सकाळी बराच वेळ झाला तरी बाहेर आली नाही. त्यामुळे तिच्या पतीने आत जाऊन पाहिले असता, तिने गळफास घेतल्याचं दिसून आलं. तिला तत्काळ रूग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी रूमची पाहणी केली. यावेळी संबधित महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून, मी आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचं त्यात म्हटलं आहे.