Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

कोरोना: पुणे जिल्हा पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट होतोय का?

Corona
, गुरूवार, 18 मार्च 2021 (15:39 IST)
जानेवारी फेब्रुवारीमध्ये पुण्यात आटोक्यात आलेला कोरोना आता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी एका दिवसात पुणे शहरात 2587 इतके नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
 
याच दिवशी पुणे जिल्ह्यात नवीन 4745 इतके रुग्ण आढळून आले. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पुणे जिल्हा हा देशात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. आता पुन्हा तो कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे.
 
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पुण्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. अनेक रुग्णांना वेळेवर बेड न मिळाल्याने जीव गमवावा लागला होता. नोव्हेंबर नंतर पुण्यातील रुग्णसंख्या कमी होत गेली. 25 जानेवारी रोजी पुणे शहरात केवळ 98 रुग्ण आढळले होते.
जानेवारी फेब्रुवारी या महिन्यांमध्ये दररोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या 300 ते 500 च्या घरात होती. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आणि बुधवारी ( 17 मार्च) आतापर्यंतची सर्वाधिक वाढ होती.
 
पुण्यात रुग्णसंख्या का वाढत आहे ?
 
अनलॉकच्या विविध टप्प्यांमध्ये अनेक व्यवहार सुरू झाले. त्यामुळे नागरिकांचा एकमेकांशी संपर्क वाढला. त्यातच गेल्या काही महिन्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका तसेच लग्नसराईचे अनेक कार्यक्रम झाल्याने देखील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं जाणकार सांगतात.
वाढत्या रुग्णसंख्येबाबत पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे सांगतात, "गेल्या काही महिन्यांपासून लोकांचा एकमेकांशी संपर्क वाढला आहे. रस्त्यांवर गर्दी होताना दिसत आहे. नागरिकांचा निष्काळजीपणा वाढत आहे."
 
"गर्दीच्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. इन्फेक्शन रेट देखील वाढल्याचा दिसून येत आहे. त्यातच पालिकेकडून टेस्टिंग देखील मोठ्या प्रमाणावर वाढवले आहे त्यामुळे देखील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे,'' वावरे सांगतात.
 
वाढलेल्या चाचण्यांची संख्या
गेल्या वर्षी सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये दिवसाला 5 ते 6 हजार नागरिकांच्या चाचण्या करण्यात येत होत्या. ही संख्या मधल्या काळात कमी झालेली दिसून आली. परंतु लक्षणे नसल्याने चाचण्यांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील कमी झाल्याने चाचण्या कमी दिसत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आलं होते. आता पुन्हा चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली असून सध्या दिवसाला पुण्यात 8 ते 10 हजार चाचण्या करण्यात येत आहेत. बुधवारी सर्वाधिक 11,230 इतक्या चाचण्या एकाच दिवशी करण्यात आल्या.
 
महाराष्ट्राचा नवीन व्हेरिएंट ?
ज्या पद्धतीने युरोप, ब्राझिल या देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला होता तसाच महाराष्ट्रात कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होऊन नवीन व्हेरिएंट तयार झालाय का याबाबत संशोधन करणे आवश्यक असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात.
 
"आपण युके, ब्राझिलचा व्हेरिएंट आपल्याकडे आढळतोय का याचा शोध घेतोय परंतु राज्यातील वाढती रुग्ण संख्या पाहता महाराष्ट्राचा नवीन व्हेरिएंट आहे का याचा शोध घ्यायला हवा. त्याचबरोबर असा नवीन व्हेरिएंट असेल तर त्यावर उपलब्ध लशी किती परिणाम कारक आहेत हे देखील कळण्यास मदत होईल," असेही ते म्हणतात.
 
कोरोनाचा प्रसार दुपटीपेक्षा जास्त
सध्या पॉझिटिव्ह येणारे 90 टक्के रुग्ण हे सौम्य लक्षणे असलेले तसेच 80 टक्के रुग्ण हे 20 ते 45 या वयोगटातले आहेत. कोरोनाच्या प्रसाराचा वेग हा दुपटीपेक्षा जास्त आहे.
एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर तयार झालेल्या अॅँटिबॉडिज या चार ते पाच महिने टिकतात असे आयसीएमआरकडून सांगण्यात आले होते.
 
त्यामुळे ज्यांना गेल्या वर्षी सुरुवातीच्या काळात कोरोनाची लागण झाली होती, त्यांना पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क लावणे, सतत हात धुणे, सोशल डिस्टिन्सिंग पाळणे आवश्यक असल्याचेही भोंडवे नमूद करतात.
 
अधिक कडक निर्बंध लावण्याचा विचार
शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये पुण्यात अधिकचे काही निर्बंध घालण्यात आले होते. त्यात आणखी वाढ करण्याचा विचार असल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
 
उद्याने, सार्वजनिक वाहतूक, तसेच जेथे गर्दी होतं आहे तिथे हे अधिकचे निर्बंध लावण्याचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतात मेडइन इंडिया Jeep Wrangler लॉन्च! 10 लाख रुपये कमी झाले किंमत, जाणून घ्या नवीन किंमत व फीचर्स?