- राहुल गायकवाड
महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या 100 हून कमी असताना, दुसरीकडे एकट्या पुणे जिल्ह्यात 6 सप्टेंबर या दिवशी राज्यातील एकूण रुग्णांपैकी तब्बल 26 टक्के सक्रीय रुग्ण असल्याचं समोर आलं आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाकडून दररोज प्रसिद्ध केलेल्या अहवालावरुन ही बाब समोर आली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा अजूनही राज्यातील सर्वाधिक बाधित जिल्हा असल्याचं दिसत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुणे जिल्हा देशात कोरोनाचा हॉटस्पॉट झाला होता. दुसऱ्या लाटेत देखील कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुण्यात अधिक होती. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना पुणे जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. 26 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात कोरोनाच्या 44 हजार 337 नव्या केसेस समोर आल्या. त्यापैकी 9815 नवीन केसेस या पुणे जिल्हातील असल्याचं राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालावरुन समोर आलं आहे.
याच अहवालामध्ये 4 सप्टेंबर रोजी धुळ्यात एकही नवीन रुग्ण आढळला नसल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर या दिवशी नंदुरबारमध्ये एक तर वर्धा, वाशिम, नागपूर, गडचिरोली, परभणी, हिंगोली, जळगाव, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 100 हून कमी कोरोनाचे रुग्ण आहेत.
सध्या पुण्याची स्थिती नेमकी कशी आहे?
एक महिन्यापूर्वी आठ ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील निर्बंध कमी करत असल्याचं कोरोना आढावा बैठकीनंतर सांगितले होतं.
त्यावेळी पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट 3.3 टक्के, पिंपरी चिंचवडचा 3.5 टक्के तर पुणे ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी रेट हा 5.5 टक्के इतका होता. त्यावेळी पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्या पुढे गेल्यास निर्बंधातील सूट तातडीने मागे घेण्यात येईल असं देखील अजित पवार म्हणाले होते.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 6 सप्टेंबर या दिवशी पुणे जिल्ह्यात 12 हजार 413 इतके अॅक्टिव्ह रुग्ण होते. याच दिवशी पुणे शहरात 198, पिंपरी चिंचवडमध्ये 133 तर पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये 416 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
पुणे जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार या दिवशी पुणे शहरात 6097, पिंपरी चिंचवडमध्ये 6691 तर ग्रामीण भागामध्ये 7810 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. रविवारच्या दिवशी चाचण्यांची संख्या कमी होत असल्याने सोमवारच्या अहवालात रुग्णसंख्या कमी दिसत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे.
ठाणे, सातारा, अहमदनगर आणि मुंबईमध्ये देखील अधिक अॅक्टिव्ह रुग्ण
पुण्यातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या राज्यात अधिक असली तरी ठाणे, सातारा, अहमदनगर, मुंबई या ठिकाणी देखील सक्रीय रुग्णांची संख्या अधिक आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 6 सप्टेंबरला ठाण्यात 7275, सातारा 6328, अहमदनगर 4975 तर मुंबईमध्ये 4273 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
तर दुसरीकडे गोंदिया जिल्हात 5, धुळ्यात 3, नंदूरबार आणि वर्ध्यात 2 तर भंडारा जिल्ह्यात केवळ 1 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
पुण्यात अधिक अॅक्टिव्ह रुग्ण का आहेत?
पुणे जिल्ह्यात नेहमीच अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. त्यामुळे पुण्याला निर्बंधातून शिथिलता देखील उशिरा देण्यात आली.
पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असली तरी पुण्याच्या ग्रामीण भागात अजूनही कोरोना आटोक्यात येत असल्याचं आकडेवारीवरुन दिसत नाही.
ग्रामीण भागात कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत. तसंच, मास्क घालण्याबाबत देखील उदासिनता असल्याचं अजित पवार गेल्या आठवड्यात कोरोना आढावा बैठकीनंतर म्हणाले होते.
पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्येबाबत बीबीसी मराठीने पुणे जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्याशी चर्चा केली.
डॉ. पवार म्हणाले, "पुण्याची लोकसंख्या अधिक आहे. तसंच पुणे जिल्ह्यामध्ये स्थलांतर देखील अधिक आहे. इतर जिल्ह्यांमधून अनेक लोक कामानिमित्त पुण्यात येत असतात. तर दुसरीकडे अजूनही नागरिकांकडून कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत. त्यातच आता निर्बंधात शिथिलता देण्यात आल्याने लोकांच्या संपर्कात वाढ झाली आहे."
"पुण्यातील ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागात कोरोनाची भीती कमी झाली आहे. त्यामुळे देखील नियम न पाळण्यावर लोकांचा भर आहे," असं डॉ. पवार म्हणाले.
पुण्यात पर्यटन क्षेत्र देखील अधिक आहेत. निर्बंध शिथिल झाल्याने पर्यटकांची गर्दी पर्यटन स्थळांवर वाढतीये. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या एखाद्या नागरिकामुळे कोणाला लागण झाल्यास रोग त्या भागात पसरण्याची शक्यता असते.
पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक असली तरी टेस्टिंग कुठेही कमी केलं नसल्याचं पवार यांनी सांगितलंय. ग्रामीण भागामध्ये दररोज साधारण 15 हजार नागरिकांची चाचणी करण्यात येत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. च लसीकरणदेखील वेगाने सुरु असल्याचं पवार यांचं म्हणणं आहे.
पुन्हा रुग्णसंख्या वाढेल - सुभाष साळुंखे
"येत्या काळात राज्यात पुन्हा केसेस वाढतील," अशी शक्यता राज्याचे आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.
डॉ. साळुंखे म्हणाले, "राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण कमी दिसत असले तरी येत्या काळात तेथे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. सध्या गणपती आणि इतर सण येऊ घातले आहेत. त्यामुळे या सणांनंतर देखील रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी घरीच सण साजरे केले पाहिजेत. सार्वजनिकरित्या सण साजरे करण्याची ही वेळ नाही."