नंदी दूध पित असल्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि देशभरात ही अफवा वेगाने पसरली. सर्वप्रथम मध्यप्रदेशात नंदी दूध पित असल्याची बातमी पसरत आता पुण्यातील पिंपरी चिंचवड पर्यंत येऊन पोहोचली. या अफवांमुळे शिव मंदिरात लोक प्रचंड गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून देण्यात आले आहे.
मध्यप्रदेशातील इंदूर, देवास,हरदा येथील काही लोकांनी नंदी दूध पित असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यावर ती पोस्ट वेगाने पसरत त्याचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले. त्यानंतर हळूहळू ही बातमी पसरली देशातील शिवमंदिरात भाविकांची गर्दी नंदीला चमच्याने दूध पाजण्यासाठी होऊ लागली. नंदीला चमच्याने दूध पाजण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. पिंपरी चिंचवडमधील काही शिवमंदिरात संध्याकाळी उशिरा पर्यंत नंदीला दूध पाजणाऱ्यांची गर्दी दिसून आली. लोकांनी रांगा लावल्या.
चिखलीतील ताम्हाणे वस्तीतील तुळजाभवानी मंदिरात नंदीला दूध पाजणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी झाली.
या घटने बद्दल बोलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हे पूर्णपणे अफवा असून नागरिकांनी यावर विश्वास ठेऊ नये. या पूर्वी देखील साल 1995 मध्ये गणपती आणि इतर मुर्त्या दूध पित असल्याची बातमी देखील देशभरात पसरली होती.