Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वाचा, पुणे शहराचा संपूर्ण ग्राऊंड रिपोर्ट : पुणे शहर आणि वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव

वाचा, पुणे शहराचा संपूर्ण ग्राऊंड रिपोर्ट : पुणे शहर आणि वाढत असलेला कोरोना प्रादुर्भाव
, गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (18:21 IST)
शिक्षणाची पंढरी असलेले पुणे आता बनले देशातील सर्वाधिक कोरोना रूग्णांचे शहर   
संपूर्ण देशात आणि महाराष्ट्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. सुरुवातीला राजधानी मुंबई, ठाणे आणि पालघरसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनोचा धोका जास्त दिसत होता. मात्र आता चित्र पूर्णपणे वेगळे तयार झाले आहे. रुग्ण संख्या वाढीत पुणेसुद्धा मागे नाही. पुण्यातही कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इथे कोरोनाचा धोका वाढणं हे सहाजिक आहे. पण मुंबईच्या तुलनेत पुण्यात कोरोनाचा फैलाव जास्त का होतोय असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. तर याचं कारण म्हणजे पुणेकरांमधील टू व्हीलर वापराचंप्रमाण. पुण्यात मोठ्या प्रमाणात दुचाकीचा वापर केला जात आहे. यामध्येही अनेकनियमांचं उल्लंघन केलं जातं. स्वत: पुणे मनपाचे आयुक्त विक्रमकुमार यांनीच हा मुद्दा पुढे आणला आहे. पुण्यात लॉकडाऊनमुळे गेले सहा महिने पीएमपी बससेवा बंद असली तरी लोक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर स्वत:च्या बाईकचा वापर करताहेत. त्यातून पुणेशहरातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेल्याचं निरिक्षण मांडलं जातं आहे. पुण्यात लॉकडाऊन असतानाही नागरिकांची रस्त्यावर वर्दळ सुरूच होती. त्यात आता राज्य अनलॉक होत असताना कोरोना संपल्यासारखे लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात रोज कोरोनाचे धडकी भरवणारे आकडे समोर येतात. पुणे जिल्ह्याबरोबरच मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचं थैमान पुन्हा नव्याने सुरू झालं आहे.
 
राज्यभरात सध्या 2,52,734 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातले सर्वाधिक पुणे, मुंबई आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये आहेत. दुसऱ्या कुठल्याही राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत. पुण्यात सर्वाधिक Covid-19 चे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात पुण्याचा आकडा अव्वल आहे. त्यामुळे चिंता वाढत आहे. पुण्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात कोरोना प्रकोप वाढतो आहे. मुंबई महानगर भागात गेल्या 24 तासांत 2227 रुग्ण दाखल झाले आहे. तर पुण्यात 2340 रुग्ण दिवसभरात सापडले आहेत.
 
पुणे शहर, पिंपरी-चिंचवडमध्ये देशाच्या सरासरीपेक्षा ग्रामीण भागाचा मृत्यूदर अधिक
 
ग्रामीण भागात अद्यापही कोरोना महामारी अनेक गैरसमज असून, आजार अंगावर काढण्याची सवय धोकादायक ठरत आहे. तसेच रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होत नाहीत. यामुळेच सध्या पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरापेक्षा ग्रामीण भागातील वाढता मृत्यूदर सध्या प्रशासनासाठी चिंताजनक ठरत आहे. यामध्ये जुन्नर तालुक्यातील मृत्यूदर तर सर्वाधिक 4.71 टक्के असून, जिल्ह्यात सर्वाधिक हॉटस्पॉट असलेल्या व सर्वाधिक रुग्ण असलेल्या हवेली तालुक्यातील मृत्यूदर केवळ 1.85 ऐवढा आहे.
 
पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजहीआरोग्य सेवा-सुविधांच्या नावाने बोंब आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना महामारी येऊन सहामहिने लोटले आहेत. यामध्ये शहरी भागात उपचार मिळताना अडचणी येत असल्या तरी किमानवेळेत उपचार उपलब्ध तरी होत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटरनिर्माण करण्यात आले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या कोविड केअर सेंटरचाचांगला लाभ होत आहे. परंतु हॉस्पिटलची गरज असणा-या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सगरज असलेल्या आणि गंभीर रुग्णांना आजही बेड उपलब्ध होतांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जिल्ह्याचा तालुकानिहाय मृत्यूदर (नगरपालिकासह) तालुका मृत्यू टक्केवारी अशी :  
 
आंबेगाव : मृत्यूदर 45, मृत्यू टक्केवारी 3.41
बारामती: मृत्यूदर 53, मृत्यू टक्केवारी 3.31
भोर : मृत्यूदर 30, मृत्यू टक्केवारी 3.53
दौंड : मृत्यूदर 56, मृत्यू टक्केवारी 3.28
हवेली : मृत्यूदर 154, मृत्यू टक्केवारी 1.85
इंदापूर : मृत्यूदर 43, मृत्यू टक्केवारी 4.50
जुन्नर : मृत्यूदर 66, मृत्यू टक्केवारी 4.71
खेड : मृत्यूदर 118, मृत्यू टक्केवारी 2.42
मावळ : मृत्यूदर 124, मृत्यू टक्केवारी 3.79
मुळशी : मृत्यूदर 50, मृत्यू टक्केवारी 2.77
पुरंदर : मृत्यूदर 55, मृत्यू टक्केवारी 3.81
शिरूर : मृत्यूदर 87, मृत्यू टक्केवारी 3.73
वेल्हा : मृत्यूदर 10, मृत्यू टक्केवारी 3.64 
 
पहील्यांदाच एकाच दिवसात पावणेपाच हजारांहून अधिक रुग्ण सापडले
 
पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.९) दिवसभरात तब्बल ४ हजार ८८५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरातील नव्या रुग्णांचा आजपर्यंतचा हा उच्चांक आहे. एकाच दिवसात पावणेपाच हजारांहून अधिक रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकाच दिवसात एक हजारांहून अधिक रूग्ण सापडण्याची घटनाही बुधवारी पहिल्यांदाच घडली आहे.
बुधवारच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २ हजार ७८ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत ६९ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार २४०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार १५२, नगरपालिका क्षेत्रात ३३५ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ८० नवे रुग्ण सापडले आहेत.
मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४१ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ७, जिल्हा परिषद क्षेत्रातील १६, नगरपालिका क्षेत्रातील २ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही मंगळवार (ता.८) रात्री ९ वाजल्यापासून बुधवार (ता.९) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.
 
दुसरीकडे बुधवारी दिवसभरात ३ हजार ८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील २ हजार १३, पिंपरी चिंचवडमधील ५०२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३४७, नगरपालिका क्षेत्रातील १५२आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ७१जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६३ हजार ७१ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत ४ हजार ७९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील १६० रूग्णांचा समावेश आहे.
webdunia
रुग्णाला व्हेंटिलेटर बेड मिळाला नसल्याने उपचाराअभावी घरातच तडफडून मृत्यू
कोरोना रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.सिंहगड भागातील पानशेत रस्त्यावरील खानापूर (ता. हवेली) येथील 40 वर्षीय कोरोनाबाधित गरीब व्यक्तीचा मंगळवारी (दि. 8) खासगी हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने उपचाराअभावी घरातच तडफडून मृत्यू झाला.
 
त्यानंतर मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठीही कोणी पुढे आले नसताना खानापूरचे सरपंच, पोलिस पाटील, जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्राचे डॉक्टर व एक तरुण अशा चौघांनी मृतदेहावर अंत्यविधी करून मानवतेचे दर्शन घडविले.
 
सिंहगड रोड येथील नवले हॉस्पिटलमध्ये बाधितावर उपचार सुरू होते. तो अत्यवस्थ अवस्थेत होता. त्याला ऑक्सिजन  बेड देण्यात आले होते, असा दावा हॉस्पिटल व तालुका प्रशासनाने केला आहे. मात्र, सरपंच नीलेश जावळकर व पोलिस पाटील गणेश सपकाळ यांनी तालुका प्रशासनाकडून कोणतीही मदन न मिळाल्याचे सांगितले.
 
मयत व्यक्तीचा भाऊही कोरोनाबाधित आहे. सोमवारी (दि.7) हे दोघेही नर्‍हे येथील कोविड सेंटरमध्ये तपासणीसाठी गेले होते. यातील एकजण अत्यवस्थ असल्याने त्याला तेथून नवले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  त्याला व्हेंटिलिटर बेडची गरज होती. मात्र, त्यासाठी त्याच्याकडे 40 हजार रुपये नसल्याने त्याला बेड मिळाला नाही. त्यामुळे तो तेथून  घरी आला. त्यानंतर त्याची तब्येत पुन्हा गंभीर झाली. अखेर दुसर्‍या दिवशी मंगळवारी सकाळी दहा वाजता त्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला. तेव्हापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत त्याचा मृतदेह घरात पडून होता. सहा तास होऊनही  त्याच्यावर अत्यंविधी करण्यासाठी तालुका प्रशासन, ग्रामस्थ, नातेवाईक कोणीही पुढे येईना. त्यामुळे सरपंच नीलेश जावळकर, पोलिस पाटील गणेश सपकाळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. आदित्य धारूडकर व  ओम तिकोणे यांनी पीपीई किट घातले. मृतदेह हातगडीवर नेऊन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

मृत व्यक्तीचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. त्याच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, लहान भाऊ, भावजय व पुतण्या असा परिवार आहे.

अखेर जम्बो कोविड केअर सेंटरचं उपचारासाठीचं कंत्राट काढून घेतलं
 
पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटरचं उपचारासाठीचं दिलेलं कंत्राट काढून घेण्यात आलं आहे. लाईफ लाईन या एजन्सीला याबाबत कंत्राट देण्यात आलं होतं. अनेक तक्रारी, रुग्णांची होणारी परवड आणि पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर चौकशी बाबत विचारण्यात आलेला खुलासा, यावरून लाईफ लाईन एजन्सी चांगलीच गोत्यात आली होती.
 
त्यानंतर एजन्सीच्या १२० डॉक्टर,नर्सिंग स्टाफने दिलेला राजीनामा यावरून लाईफ लाईन या एजन्सीचे काम थांबवण्यात आले. पालिकेककडे यांचं नियंत्रण देण्यात आलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेसह काही सरकारी स्टाफ नेमण्यात आला आहे.
 
अखेर बेजबाबदार लोक प्रतिनिधीला दंड, विनामास्क होते फिरत 
पुणे महापालिकेने शहर पोलिसांसोबत शहरात विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्ध आणि थुंकी बहाद्दरणविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. काही लोकप्रतिनिधीही बेजबाबदारपणे वागू लागले आहेत. गुरुवारी (दि.१०) सकाळी आपल्या आलिशान मोटारीमधून चार मित्रांसह विनामास्क जात असलेल्या नांदेडचे आमदार अमरनाथ अनंतराव राजूरकर यांना पालिका - पोलीस कर्मचाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. या आमदाराकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आमदाराने बघून घेण्याची धमकी दिल्यानंतरही आपल्या कर्तव्यापासून हे कर्मचारी जराही विचलित झाले नाहीत.
 
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी तसेच कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शास्त्रीनगर चौकामध्ये कारवाई करत होते. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आलिशान मोटारीमधून (एमच २६, बीआर ५९९९) चौघे विनामास्क जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी वाहन चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. परंतु, वाहन चालकाने गाडी थांबली नाही. तो तसाच भरधाव पुढे निघाला. गाडीतील सर्व विनामास्क असल्याने पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर गाडी अडविली. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चालकाला तुम्ही सर्व विनामास्क फिरत असल्याने दंडाची पावती करावी लागेल असे सांगितले. त्यावर चालकाने हुज्जत घालत गाडीमध्ये आमदार बसले आहेत; त्यांची तुम्ही पावती करणार का असा प्रश्न केला. त्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा नियम राज्य शासनाने केलेला असून सर्वसामान्य नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना नियम सारखेच आहेत असे सांगितले.
 
पुणे कोरोना राज्यकर्ते काय म्हणतात :
webdunia
कोरोनाच्या अनुषंगाने तपासण्यांची क्षमता वाढवून बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळवून द्यायला हवेत, अशा सूचना खासदार शरद पवार यांनी केल्या. कोविड – 19 विषाणू प्रादूर्भावाच्या अनुषंगाने करण्यात येतअसलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाहीबाबत पुण्यातील विधानभवन सभागृहात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीयपर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्रीदिलीप वळसे पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणेयांच्या प्रमुख उपस्थितीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली.
 
कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकार, राज्य सरकार, पुणे जिल्हाप्रशासन तसेच पुणे व पिंपरी महानगरपालिका विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे.या संकटकाळात मानवतेच्या दृष्टीने सर्वांनी मिळून कोरोना विषाणूविरुद्धची लढाईएकजुटीने लढल्यास आपण नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
 
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीणभागात वाढता कोरोनाचा संसर्ग रोखणे गरजेचे आहे. शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलतादिल्यानंतर नागरिक मोठ्या प्रमाणावर विनामास्क घराबाहेर पडतांना दिसत आहे. त्यामुळे ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्कचा नियमित वापरकरण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशकेंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी दिले.
 
आंबेगाव तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक सोईसुविधांमध्ये वाढ करावी. तसेच आवश्यकता असल्यास खाजगी डॉक्टरांना मदत घेण्यात यावी, तळेघर, घोडेगाव व मंचर येथील कोविड उपचार केंद्र वबेडची संख्या वाढवावी. आवश्यक साधनसामुग्रीचे गरजेप्रमाणे नियोजन करावे, मंचर उपजिल्हारुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधांबरोबरच याठिकाणच्या आवश्यक सुविधेबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी अशा सूचना राज्याचे कामगार व उत्पादनशुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नागपूरमध्ये व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा, अनेकांचे जीव धोक्यात