Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किरीट सोमय्या : ...आणि 'त्या' पायऱ्या काँग्रेसनं गोमूत्रानं स्वच्छ केल्या

किरीट सोमय्या : ...आणि 'त्या' पायऱ्या काँग्रेसनं गोमूत्रानं स्वच्छ केल्या
, शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (20:08 IST)
भाजप खासदार किरीट सोमय्या आज (11 फेब्रुवारी 2022) पुन्हा एकदा पुणे महापालिकेत आल्यानं हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
 
गेल्या शनिवारी (5 फेब्रुवारी 2022) किरीट सोमय्या पुणे महापालिकेत आले असताना, शिवसैनिकांसोबत त्यांची झटापट झाली आणि ते पायऱ्यांवरच कोसळले होते.
 
आज (11 फेब्रुवारी 2022) किरीट सोमय्यांचा त्याच पायऱ्यांवर पुणे शहरातील भाजप कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला.
 
किरीट सोमय्या ज्यावेळी पुणे महापालिकेच्या आवारात आले, तेव्हा ते गाडीतून न उतरता बाहेर गेले. नंतर शेकडो कार्यकर्त्यांसोबत ते पुन्हा महापालिकेच्या आवारात आले.
 
'त्या' दिवशी काय झालं होतं?
5 फेब्रुवारी 2022 रोजी किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेत आले होते.
 
त्यावेळी महापालिकेतील भ्रष्टाचारदेखील बाहेर काढा, अशी मागणी करत शिवसैनिकांनी महापालिकेच्या पायऱ्यांवरच त्यांना घेराव घातला. यादरम्यान झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले.
त्यात त्यांना दुखापत झाली आणि त्यानंतर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आलं होतं.
 
त्यांनंतर ज्या ठिकाणी किरीट सोमय्या पडले होते, त्या ठिकाणी त्यांचे स्वागत करणार असल्याचे भाजपने जाहीर केले होते. त्यानुसार आज (11 फेब्रुवारी 2022) सोमय्या पालिकेत आले होते.
 
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
किरीट सोमय्या येणार म्हणून पुणे महापालिकेच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
 
महापालिकेच्या गेटसमोर बॅरिगेट लावून रस्ता बंद करण्यात आला होता.
सुरुवातीला सोमय्या गाडीतून पालिकेत आले. त्यांच्या स्वागताला काही कार्यकर्ते पालिकेच्या दारासमोर उभे होते. मात्र किरीट सोमय्या गाडीतून खाली उतरले नाहीत. ते तसेच गेटच्या बाहेर गेले आणि बाहेर उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन ते चालत पालिकेत आले.
 
पालिकेच्या दारावर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना न जुमानता भाजप कार्यकर्ते आत आले. यावेळी देखील धक्काबुकी झाली. किरीट सोमय्या यांनी स्वागत स्वीकारले आणि ते महापालिकेत गेले.
 
कोव्हिड सेंटरचं काम चहावाल्याला दिलं - सोमय्या
पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर सत्कार घेतल्यानंतर सोमय्या म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या गुंडांनी मागच्या शनिवारी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर ज्या कंपनीला कोव्हिड सेंटरचं काम दिलं त्याच्या मालकाचं नाव सांगावं. मी आज पुणेकरांना त्या कंपनीच्या मालकांच नाव सांगणार आहे. त्या कोव्हिड कंपनीचा मालक केईएम हॉस्पिटलच्या मागचा चहावाला आहे."
"उद्धव ठाकरे पुण्यातील लोकांच्या जीवाशी खेळले आहेत. त्यांचे मित्र संजय राऊत यांची बेनामी कंपनी आहे तिला 100 कोटीचे कंत्राट दिले. त्या कंपनीला पुणे महानगरपालिकेने ब्लॅक लिस्ट केल्यानंतर आदित्य ठाकरेने मुंबई महापालिकेत चार कंत्राट दिले," असाही आरोप किरीट सोमय्यांनी यावेळी केला.
 
'त्या' पायऱ्या काँग्रेसनं गोमूत्रानं स्वच्छ केल्या
किरीट सोमय्यांचा सत्कार ज्या ठिकाणी झाला, ती पायरी काँग्रेसकडून गोमूत्र आणि गुलाबाच्या पाण्याने स्वच्छ करण्यात आली.
 
महापालिकेतील इतर प्रश्न सोडून केवळ प्रसिद्धसाठी किरीट सोमय्यांना आणण्यात आलं.
 
महापालिकेची सर्व दारं बंद केल्याने नागरिकांना पालिकेत येता आले नाही, याचा निषेध म्हणून पायरी धुण्यात आली, असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vivo Pro Kabaddi League: हरियाणा स्टीलर्स आणि पुणेरी पलटण यांच्यात सामना