केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या आज पुणे येथे एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित झाल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने तीव्र निदर्शनं केली. महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या स्थळी गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना कार्यक्रमस्थळा बाहेर काढले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिरात कार्यक्रम सुरू असताना घोषणाबाजी केली आहे.
स्मृती इराणी या पुस्तक प्रकाशनासाठी आल्या होत्या. वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निदर्शनं केली. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आणि काही वेळानंतर सोडून दिले.
देशातील वाढती महागाई, घरगुती गॅसचे वाढलेले दर यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावना केंद्र सरकार पर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मंत्री इराणी यांना चूल व बांगड्या भेट देण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचल्या होत्या.
पोलिसांनी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यांच्यासह महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
पुणे शहर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या पोहोचल्या, आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या विरोधात व स्मृती इराणी यांच्या विरोधात 'हाय, हाय महंगाई मोदीजीने लाई., जबसे भाजपा सत्ता में है आयी, कमरतोड महंगाई लायी, क्योंकि गॅस भी कभी सस्ती थी,स्मृती जी याद हैं ना? अशा प्रकारच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 महिला कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींच्या बालगंधर्वमध्ये होणाऱ्या कार्यक्रमावेळी निषेधाचे पोस्टर्स दाखवण्याकरता बाल्कनीमध्ये गेल्या.
तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि गोंधळ सुरू झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या, गोंधळ झाला. यामध्ये वैशाली नागवडे यांच्यासोबत धक्काबुक्की झाल्याची व्हीडिओत दिसत आहे.