Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे कोरोना : MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचं निधन, डीवायएसपी परीक्षेची करत होता तयारी

पुणे कोरोना : MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचं निधन, डीवायएसपी परीक्षेची करत होता तयारी
, रविवार, 4 एप्रिल 2021 (16:26 IST)
''त्याला वर्दीची खूप आवड होती. डीवायएसपी व्हायचं त्याचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी तो पुण्यात आला होता. आता ते स्वप्न स्वप्नच राहीलं,'' कोरोनामुळे जीव गमवावा लागलेल्या एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे याचा चुलत भाऊ अविनाश शितोळे सांगत होता.
वैभव 2014 साली पुण्यात एमपीएससीची तयारी करण्यासाठी आला होता. तो मूळचा अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्याचा. त्याने याआधी अनेक परीक्षा देखील दिल्या होत्या. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. आंदोलनानंतर तीन दिवसांनी त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो रुग्णालयात दाखल झाला होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत होती परंतु शुक्रवारी त्याची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला.
वैभवबद्दल सांगताना अविनाश म्हणाला, ''वैभव विद्यार्थ्यांच्या मोर्चात सहभागी झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्याला श्वास घ्यायला त्रास झाल्याने तो ससून रुग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर तेथे उपचार सुरु होते. हळूहळू तो रिकव्हर होत होता. त्याला दुसरा कुठलाच त्रास नव्हता परंतु अचानक त्याची तब्येत खालावली आणि त्याचा मृत्यू झाला.''
''2014 पासून तो पुण्यात तयारी करत होता. त्याचं नाशिकला इंजिनिअरींग झालं आहे. आंदोलनानंतर झालेली परीक्षा त्याला देता आली नाही. त्याला एक बहीण आहे, तिचं नुकताच लग्न झालं. घरचे शेती करतात. आई-वडिलांना तो एकुलता एक होता.''
''त्याला पोलिसात जायचे होते, वर्दीची त्याला क्रेझ होती. तो लहानपासूनच हुशार होता. शाळेत देखील तो चांगल्या मार्कांनी पास होत होता. लॉकडाऊनमध्ये पुण्यातच होता तो, घरी गेला नव्हता.'' अविनाश सांगत होता.
 
विद्यार्थ्यांमध्ये भीती
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. दिवसाला 4 ते 5 पाच हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी पुण्यात आहेत. त्यातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच रुममध्ये अनेकजण राहत असल्याने एकमेकांना लवकर संसर्ग होतोय आणि त्यामुळेच आता विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.
कोरोनाची लागण झाल्यामुळे पुण्यातील जंम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत असलेला महेश घरबुडेला वाढती रुग्णसंख्या पाहता 11 तारखेला होणारी मेन्सची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी असं वाटतंय. 'अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना परीक्षा देणे शक्य होणार नाही. त्यातच या काळात विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही' असे देखील तो म्हणतो.
 
विद्यार्थ्यांच्या जेवणाची अडचण
महेशप्रमाणेच अमित सोळंकेची परिस्थिती आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून त्याच्याही मनात धडकी भरतीये. सध्या पुण्यात मिनी लॉकडाऊन असल्याने विद्यार्थ्यांना जेवण मिळणे कठीण झाले आहे. त्यातच एकाच ठिकाणी अनेक विद्यार्थी राहत असल्याने कोरोनाची लागण होण्याचा धोका देखील अधिक असल्याचं तो सांगतो.
लक्षणे असूनही कोरोना चाचणीला टाळाटाळ
पुढच्या रविवारी परीक्षा असल्याने कोव्हिडची लक्षणे दिसत असताना अनेक विद्यार्थी टेस्ट करत नसल्याचे निलेश निंबाळकर याने सांगितले. आपल्याला क्वारंटाईन करतील, परीक्षा देता येणार नाही म्हणून विद्यार्थी गोळ्या घेऊन अंगावर काढत आहेत, असंही तो म्हणाला.
कोरोनाच्या भीतीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आता गावाकडची वाट धरलीये. कोरोनाची लागण झाली तरी काळजी घेण्यासाठी कोणी नसल्याने आपलं कसं होणार अशी भीती अनेकांच्या मनात आहे. एकीकडे परीक्षा आहे तर दुसरीकडे वाढणारी रुग्णसंख्या त्यामुळे परीक्षा द्यावी की गावाकडे जावं या द्विधा मनस्थितीत सध्या अनेक विद्यार्थी आहेत.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

छत्तीसगड मध्ये नक्षलवादी हल्ल्यामुळे अमित शहा यांनी निवडणूक रॅली रद्द केली