पुण्यात शिवसैनिकांसोबत झालेल्या झटापटीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या पायऱ्यांवर कोसळले आहेत.
कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंदर्भातील चर्चेसाठी किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत आले होते.
मात्र यावेळी पुणे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचे निवेदन स्वीकारावे, अशी मागणी करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची वाट अडवली. यावेळी झालेल्या झटापटीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर कोसळले.
पुणे महानगरपालिकेच्या आवारात माझ्यावर शिवसेना गुंडांनी हल्ला केला आहे, असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
शिवसेनेकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्यास ती इथं अपडेट करण्यात येईल.
भाजप नेत्यांनी मात्र या प्रकारामुळे शिवसेना आणि सरकारवर कठोर टीका केली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलंय, "राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही.
"महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध."
प्रकरण काय?
भाजप नेते किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर असताना ते पुणे महानगरपालिकेला भेट देणार होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना महापालिकेत जाण्यापासून रोखले. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. या धक्काबुकीत किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले त्यांना सुरक्षारक्षकांनी बाजूला करून महापालिकेच्या बाहेर नेले.
किरीट सोमय्या महापालिकेच्या आयुक्तांना भेटायला आले होते. त्यावेळी पालिकेत भ्रष्टाचार होत असून त्याचे निवेदन देण्यासाठी शिवसैनिक पालिकेत आले होते. यावेळी पालिकेच्या जुन्या इमारतीत किरीट सोमय्या आल्यावर शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली तसेच निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठ्याप्रमाणावर धक्काबुक्की झाली.
या धक्काबुक्की नंतर सुरक्षरक्षकांनी त्यांना बाहेर काढले. सध्या किरीट सोमय्या यांना पुण्यातील संचेती रुग्णांलयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
'सोमय्या यांना मुका मार लागला'
सोमय्या यांना मुका मार लागला आहे. त्यांच्या माकड हाडालादेखील मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असं संचेती हॉस्पिटलचे डॉक्टर पराग संचेती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
संचेती म्हणाले, "किरीट सोमय्या यांना रुग्णालयात आणलं त्यावेळी त्यांचा बीपी वाढलेला होता. पण आता नॉर्मल आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही.
"त्यांच्या हाताला प्लास्टर केलं आहे. त्यांना आरामाची गरज आहे. एक दिवस निगराणीखाली ठेवून उद्या सुटी दिली जाईल."