Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणेकरांनो, मांजर पाळण्याचा विचार करताय, मग हे वाचा

पुणेकरांनो, मांजर पाळण्याचा विचार करताय, मग हे वाचा
, शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (22:53 IST)
अनेकांना घरात कुत्रा किंवा मांजर पाळायला आवडतात. पण त्यासाठी परवाना घेणंही आवश्यक आहे हे मात्र अनेकांच्या गावीही नसतं. पण महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या अंतर्गत पाळीव प्राण्यांसाठी परवाना घेणं बंधनकारक आहे.
 
पुणे महानगरपालिकेने नुकतंच कुत्रा पाळण्यासाठी परवाना घेण्याची ऑनलाईन सुविधा सुरू केली आहे. याच प्रक्रियेमार्फत मांजर पाळण्याचा परवानाही मिळणार आहे आणि याचीच मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कुत्रा मोठ्या प्रमाणात पाळला जातो आणि त्याचप्रमाणे मांजर पाळण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे असं पुणे पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता घरगुती मांजरी पाळण्याच्या संदर्भातही धोरण ठरवण्यात आलं आहे. पाळीव प्राण्यांची नोंदणी महानगरपालिकेकडे करणं बंधनकारक आहे. “भारत सरकारच्या गाईडलाईन्सनुसार पाळीव मांजर असो की कुत्रा असो त्यासाठी पाळीव प्राण्याची नोंदणी करणं आवश्यक आहे. या नियमानुसार घरात एक किंवा दोन पाळीव प्राणी ठेवता येतात. त्यासाठी पुणे महानगरपालिकेची वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल. पूर्वी परवान्यासाठी अडचणी यायच्या म्हणूनच आता आपण ही प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. आमच्या वेबसाईटवर जाऊन हे करता येईल,” अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ आशिष भारती यांनी दिली.
 
परवाना का आवश्यक?
मांजर पाळण्यासाठी परवाना घेण्याची व्यवस्था नव्याने सुरू करण्यात आली आहे. मात्र कुत्र्यासाठी परवाना घेण्याची पद्धत प्रचलित असुनही त्याला अत्यल्प प्रतिसाद आहे. पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार 2018 साली एका खाजगी संस्थेने केलेल्या पशुगणनेनुसार अंदाजे 3 लाख १० हजार इतकी पाळीव कुत्र्यांची संख्या पुणे महानगरपालिका हद्दीत होती. पण पुर्ण शहरात फक्त 5691 परवाने देण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये परवाना घेण्याचं प्रमाण खूप कमी आहे. परवाना काढणं का आवश्यक आहे हे सांगताना वेटरनरी डॉक्टर महेश राऊत यांनी सांगितलं की, “हे फक्त पुण्यातच लागू आहे असं नाही. प्रत्येक सिविक बॉडी क्षेत्रात हा नियम असतो. परवाना देण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की प्राण्यांचं लसीकरण वेळेवर आणि योग्य पद्धतीने झालं आहे की नाही याचे रेकॉर्ड महानगरपालिकेकडे राहतात.
 
खरंतर विनापरवाना प्राण्याची तक्रार जर केली गेली तर, त्यासंदर्भात कारवाई पण होऊ शकते.” तज्ज्ञांच्या मते, आपल्या प्राण्यांपासून इतरांना त्रास होऊ नये यासाठी सुद्धा परवाना घेणं महत्त्वाचं ठरतं. कारण परवाना घेताना काही अटी आणि शर्तींचं पालन करणं बंधनकारक असतं. पण परवाना घेण्याचा नियम इतका आवश्यक असुनही ते घेण्याचं प्रमाण इतकं कमी का आहे? याविषयी जे सध्या प्राणी पाळतात त्यांच्याकडून आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यातील बहुतांश लोकांनी परवाना घेतला नव्हता आणि त्यामुळे त्यांचं नाव उघड न करण्याच्या अटीवर त्यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली.

प्राणीप्रेमींचं मत
ििबावध भागात पाहणाऱ्या एका 42 वर्षीय गृहस्थांकडे सध्या दोन लॅब्राडोर जातीचे दोन कुत्रे आहेत. त्यांनी सांगतिलं की परवाना घेणं प्रक्रिया फार त्रासदायक आहे. “परवान्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात जावं लागतं. त्यासाठी चकरा माराव्या लागतात. ते वेळेवर मिळतंही नाही. मग माझ्या एका मैत्रीणीचे अप्लिकेशन देऊन दोन महिने झाले तरीही परवाना आला नाही. मग काय उपयोग? आठवण करून देण्यासाठी तिलाच चकरा माराव्या लागल्या. आधी कुत्र्यांचे परवाने त्यांनी द्यावेत. मग मांजरांसाठी लागू करावेत. साधारणपणे सगळे पेट पॅरेंट्स आपआपल्या प्राण्यांची योग्य काळजी घेतातच,” अशी माती त्यांनी दिली. कुत्रा आणि मांजरांसाठी परवाना देण्यामागे काही संसर्गजन्य आजार उद्भवला तर त्यासाठी पालिकेकडे माहिती उपलब्ध असणे हा सुद्धा एक उद्देश असल्याचं पुणे पालिकेने नमुद केलं आहे. आता ऑनलाईन व्यवस्था सुरू झाल्याने परवाना घेणारे वाढतील असा अंदाज आहे. “आमच्याकडे 2 वर्षांपासून जर्मन शेफर्ड कुत्रा आहे. त्याचं लसीकरण, मायक्रो चिपसुद्धा लावून घेतलं आहे. जेव्हा ऑनलाईन व्यवस्था सुरू होईल तेव्हा आपण परवाना घेऊ असा विचार आम्ही केला होता. परवाना घेण्यासंबंधीचं महत्त्व आम्हाला माहिती आहे,” असं एका 32 वर्षीय एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने सांगितलं.
 
परवाना न घेता प्राणी पाळल्यास काय कारवाई केली जाते
याबद्दल माहिती देताना पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ आशिष भारती यांनी सांगितलं की, "जर आमच्याकडे कुणी तक्रार केली की अमुक अमुक घरात किंवा फ्लॅटमध्ये अनोंदणीकृत पाळीव प्राणी आहे तर त्या व्यक्तीला पालिकेकडून नोटीस देण्यात येते आणि त्यांची नोंदणी करून घेण्यात येते."
 
Published By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिद्धांत वीर सूर्यवंशीला जास्त व्यायाम करणं जीवावर बेतलं? व्यायामावेळी 'या' चुका जीवघेण्या ठरू शकतात