Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राहुल बजाज : 'मारवाडी बनिया' जेव्हा मराठी मुलीच्या प्रेमात पडला..

राहुल बजाज : 'मारवाडी बनिया' जेव्हा मराठी मुलीच्या प्रेमात पडला..
, शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (19:10 IST)
ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं बालपण काळात महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात गेलं होतं. पुढे काही काळाने ते पुण्यात दाखल झाले. सुरुवातीपासूनच राहुल बजाज हे मराठी वातावरणातच राहिले, वाढले.
 
मूळचे गुजराती मारवाडी असलेल्या राहुल बजाज यांची नाळ महाराष्ट्राशी खूप घट्ट जुळलेली होती. विशेष म्हणजे, राहुल बजाज यांचा प्रेमविवाह एका मराठी मुलीशी झाला होता.
 
याबाबत इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला होता.
प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलीशी विवाह
1961 साली म्हणजे वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी राहुल बजाज हे रुपा घोलप यांच्याशी विवाहबद्ध झाले. रुपा घोलप या एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कन्या होत्या.
 
रुपा घोलप यांना 'मराठी ब्युटी क्वीन' म्हणून ओळखलं जात असे. ऐन तारुण्यात प्रवेश करत असतानाच राहुल बजाज त्यांच्या प्रेमात पडले.
अखेर प्रेमाचा यशस्वी प्रवास करून राहुल आणि रुपा यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. बजाज कुटुंबातील तो पहिला प्रेमविवाह होता, असं म्हटलं जातं.
 
याबाबत बोलताना राहुल बजाज म्हणाले होते, हा फक्त बजाज कुटुंबातील पहिला प्रेमविवाह होता असं नाही. तर मारवाडी-गुजराती औद्योगिक समाजातील तो पहिला प्रेमविवाह होता.
 
आपल्या वैवाहिक जीवनातील सुरुवातीच्या आठवणी सांगताना राहुल बजाज म्हणाले होते, "रुपा घोलप यांच्याशी विवाह झाल्यानंतर आमचा सुखाचा संसार सुरू होता. दरम्यान माझी पत्नी रुपा मला मजेत म्हणायची, तुझ्याशी विवाह करण्यासाठी मी किती त्याग केलाय पाहा, राहुल. मी मराठी ब्राह्मण आहे. तू मारवाडी-बनिया आहेस. तुझ्या डोक्यात नेहमी पैशाचाच विचार सुरू असतो."
 
पत्नीसोबत खास नातं
राहुल बजाज यांच्या पत्नी रुपा यांचा जन्म 7 सप्टेंबर 1938 साली झाला होता. वयाच्या 75 व्या वर्षी 2013 साली त्यांचं निधन झालं.
 
रुपा यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईच्या बांद्रा येथील सेंट जोसेफ शाळेत झालं. पुढे त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ त्यांनी त्याच ठिकाणी शिक्षक म्हणूनही कार्यरत होत्या.
 
दरम्यान, रुपा घोलप यांना मॉडेलिंगचाही छंद होता. त्यांनी काही काळ मॉडेलिंगही केली होती. त्यांना मराठी ब्युटी क्वीन अशी ओळख त्या काळी मिळाली होती.
 
राहुल बजाज आणि रुपा बजाज यांचं एकमेकांवरचं खूप प्रेम होतं. कधीही रुपा यांचा उल्लेख व्हायचा, तेव्हा तिचं आणि माझं नातं किती खास होतं, हे सांगताना राहुल बजाज भरभरून बोलायचे.
 
मुलाखतीत रुपा यांच्याविषयी सांगताना राहुल बजाज पुढे म्हणतात, "माझी पत्नी खूप समजूतदार होती. ती माझ्यासाठी नेहमीच खास राहिली. तिने माझ्यासाठी खूप काही केलं."
 
पुण्यात ओळख निर्माण केली
बजाज कंपनीच्या वेबसाईटवर रुपा बजाज यांच्याविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे.
 
रुपा बजाज यांना चालू घडामोडींविषयी खूप ज्ञान होतं. त्यांना वाचन करायला खूप आवडत असे. तसंच त्या पुण्याच्या इंम्प्रेस गार्डनच्या बोर्डवरही होत्या.
 
लग्नानंतर रुपा बजाज या राहुल यांच्यासह पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी ते पुण्यात बजाज ऑटो कॉलनी परिसरात राहत असायचे.
तिथे इतर कर्मचाऱ्यांच्या पत्नींना सोबत घेऊन त्यांनी वनिता मंडळाची स्थापना केली होती. त्या महिलांनाही लहान मुलांचे कपडे विणण्यास त्या प्रोत्साहित करत. त्यांनी हातांने बनवलेल्या वस्तूंची विक्री त्यांनी पुणे क्लबच्या सेलमध्ये केली होती.
 
लग्नानंतर काहीच दिवसांत रुपा यांनी परिसरातील महिलांमध्ये एक वेगळी ओळख प्रस्थापित केली. तेथील महिला विविध विषयांवर सल्ला किंवा मदत मागण्यासाठी रुपा यांच्याकडे येत असत.
 
सासऱ्यांनी कंपनीत एक रुपयाही गुंतवला नाही
राहुल बजाज यांची बजाज कंपनी देशातील उद्योग क्षेत्रात आघाडीवर येत होती. त्यावेळी उद्योग विश्वात बजाज कंपनीचे शेअर्स घेण्याविषयी प्रचंड चर्चा होत असे.
 
पण राहुल बजाज यांचे सासरे एल. टी. घोलप यांनी कधीच बजाज कंपनीचे शेअर विकत घेतले नाहीत.
 
ICS अधिकारी असलेले एल. टी. घोलप आपल्या कडक स्वभावासाठी ओळखले जात. त्यांनी बजाज यांच्या कंपनीच एक रुपयाचीही गुंतवणूक कधी केली नाही, असं राहुल बजाज यांनी सांगितलं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अॅमेझॉन कर्मचाऱ्यांना मास्कपासून मुक्ती