Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिरुर: भावावर हल्ला, भावजयीची हत्या करुन पळून जाताना तरुणाचा अपघातात मृत्यू

death
, बुधवार, 26 एप्रिल 2023 (15:57 IST)
पुणे जिल्हातल्या शिरुर तालुक्यातील आंबळे गावात मंगळवारी पहाटे (25 एप्रिल 2023) रोजी एक धक्कादायक घटना घडली. 25 वर्षीय तरुणाने आपल्या मोठ्या सावत्र भाऊ आणि भावजयीवर हल्ला केला. यामध्ये भावजयी जागीच ठार झाली आणि मोठा भाऊ गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर तरुण मोटरसायकलहून पळून जात असताना एका कारला धडक झाली. या अपघातात त्याचाही मृत्यू झाला.
 
प्रियंका सुनील बेंद्रे (वय 28) आणि सुनील बाळासाहेब बेंद्रे (वय 30) हे दाम्पत्य आयटी कंपन्यांमध्ये नोकरीला होतं. काही वर्षांच्या आधीच त्यांचं लग्न झालं होतं. नोकरीसाठी ते पुण्यात राहत होते.
 
पुढच्या आठवड्यात नोकरीसाठी ते दोघं इंग्लडमध्ये जाणार होते, म्हणून ते गावी सर्वांना भेटण्यासाठी आले होते. पण आपल्या नशिबात काय आहे याची कल्पना त्यांना नव्हती.
सुनीलचा लहान सावत्र भाऊ अनिल बाळासाहेब बेंद्रे (वय 25) हा सुद्धा ग्रॅज्युएट होता आणि पुण्यातल्या कंपन्यांमध्ये नोकरी करायचा.
 
पण व्यसनाधिनतेमुळे त्याची नोकरी टिकत नव्हती. यामुळे त्याला त्याच्या वडिलांनी त्यांच्या मूळगावी आंबळे इथे आणलं होतं. पण यावरुन अनिल नाराज होता.
 
त्याला शेती करण्यात रस नव्हता आणि गावात राहायचं नव्हतं. यावरुन त्याचं त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांसोबत सारखे वाद व्हायचे अशी माहिती पुढे आली.
काही दिवसांपूर्वीच प्रियंका आणि सुनील आंबळे गावात घरी राहायला आले होते. नोकरीसाठी परदेशात जाण्याचा त्यांचा प्लॅन झाला होता.
 
झोपेतच हल्ला
अनिलच्या वागण्याने मात्र घरात टेन्शन होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिलने 23 एप्रिल 2023 रोजी खोलीत स्वत:ला कोंडून घेऊन घरातले काच, टेबल यांची तोडफोड केली.
 
शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “अनिल काम धंदा नीट करत नव्हता आणि व्यसनाधीन झाला होता. त्याचं करिअर बनावं म्हणून यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला आंबळेमध्ये आणलं होतं. पण त्याची शेती करण्याची आणि गावी राहण्याची मानसिकता नव्हती. त्यामधून त्याने 23 तारखेला घरीच एका खोलीत कोंडून घेऊन घरातल्या काचांची, टेबलांची तोडफोड करुन नुकसान केलं होतं. कुटुंबाने त्याला समजावून सांगतिलं होतं.”
 
अनिल हा वैफल्यग्रस्त होता, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली. यातुनच अनिलने धक्कादायक पाऊल उचललं असावं असा अंदाज आहे.
मंगळवारी पहाटे साडेचार वाजता सुनिल आणि त्याची पत्नी प्रियंका टेरेसवर झोपले होते. वडील खाली ओसरीवर झोपले होते. बाकी लोक घरात खाली हॉलमध्ये झोपले होते. अनिल खाली बेडरुममध्ये झोपला होता.
 
"पहाटे साडेचारच्या दरम्यान त्याने जिन्याने वरती जाऊन भावजयी आणि भावावर हल्ला करुन भावजयीला ठार केलं. भाऊ गंभीर जखमी झाला. त्यानंतर तो वडिलांच्या अंगावर देखील धावून गेला. पण त्यांचे बाकीचे कुटुंबीयही आवाज ऐकून तिथे आले होते. त्यामुळे तो तिथून पळून गेला,” असं पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितलं.
 
अनिलने हल्ला करण्यासाठी चाकू, व्यायामासाठी वापरले जाणारे डंबेल आणि विटा हे साहित्य वापरल्याचं समोर आलं.
मोटरसायकलवरुन जाताना अनिलचा मृत्यू
आवाज ऐकून बाकी कुटुंबीय टेरेसवर गोळा झाले. तेव्हा अनिल तिथून पळून गेला. त्यानंतर तो मोटरसायकल घेऊन चौफुला गावाच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर आला. तिथेच त्याचा अपघात झाला.
 
शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “जाताना तो आंबळेतून चौफुला रोडवर आला. तिकडे जात असताना त्याने त्याची मोटरसायकल स्विफ्ट कारवर घातली. या जोरदार धडकेत तो स्वतःही गंभीर जखमी झाला. त्याला ससून दवाखान्यात दाखल केलं होतं. मात्र, त्याचाही मृत्यू झालाय.”
 
“प्रथमदर्शनी नैराश्यातून ही दुर्दैवी घटना झाल्याचं दिसून येते. यामध्ये कलम 302, 206 प्रमाणे गुन्हा दाखल आहे,” अशी माहिती सुरेशकुमार राऊत यांनी दिली.
निराशा आणि वैफल्यातून अनिलने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chhattisgarh: दंतेवाडाच्या अरणपूरमध्ये IED स्फोट, 10 जवान शहीद