Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दोन महिन्यांचे वेतन थकले; ‘जम्बो’तील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

दोन महिन्यांचे वेतन थकले; ‘जम्बो’तील डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
, मंगळवार, 25 मे 2021 (21:59 IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नेहरुगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरचे संचलन करणा-या ‘मेड ब्रोज’ या खासगी संस्थेने दोन महिन्यांपासून वेतन न दिल्याने कर्मचा-यांनी  काम बंद आंदोलन केले. डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, साफसफाई कर्मचारी अशा 500 ते 600 जणांचे दोन महिन्यांपासून वेतन थकले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचा-यांनी आंदोलन केले.
दरम्यान, महापालिकेला बिले अदा केली आहेत. महापालिकेकडून ती मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे वेतन थकल्याचे स्पष्टीकरण देत शुक्रवारपर्यंत वेतन दिले जाईल, असे संस्थेकडून सांगण्यात आले. तर, संस्थेने बिल जमा केले नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केलं.
पीएमआरडीएच्या वतीने नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम येथे 816 बेडचे अद्ययावत जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. सध्या या सेंटरमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचे असे 800 बेड कार्यान्वित आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने हे सेंटर मेड ब्रोज या खासगी संस्थेला संचलनास दिले आहे. जम्बो सेंटरमध्ये सुमारे 500 ते 600 कर्मचारी काम करतात. त्यात डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, साफसफाई कर्मचा-यांचा समावेश आहे. 
जम्बो सेंटरमध्ये काम करत असलेल्या कर्मचा-यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकले आहे. मागील काही दिवसांपासून आज, उद्या वेतन केले जाईल, असे आश्वासन दिले जात होते. परंतु, वेतन काही मिळत नव्हते. त्यामुळे संताप अनावर झालेल्या कर्मचा-यांचा आज उद्रेक झाला. त्यांनी काम बंद आंदोलन केले.
‘आम्ही किती दिवस थांबणार, आमच्या घरी अनेक समस्या आहेत. दोन महिने झाले पगार नाही. आम्ही धोका पत्करुन आयसीयूत काम करतो. महापालिकेकडून संस्थेला पगार दिला जात नाही का, भाडे दिले नसल्याने आमच्या घराला कुलुप लागले. दोन महिने झाले. जीव धोक्यात घालून काम करतो आहोत. 10 तारखेपासून केवळ आश्वासन दिले जाते. 500 ते 600 लोकांचा पगार अडकला आहे’, असा आरोप कर्मचा-यांनी केला.
 
महापालिकेला बिल दिले, शुक्रवारपर्यंत कर्मचा-यांना वेतन मिळेल – डॉ. संग्राम कपाले
मेड ब्रोजचे डॉ. संग्राम कपाले म्हणाले, बिलं महापालिकेला 5 तारखेला दिली आहेत. त्यांची प्रक्रिया चालू आहे. त्याला विलंब होत असल्याने अडचण निर्माण झाली. आम्ही पैसे उपलब्ध करुन वॉर्ड बॉय, साफसफाई कर्मचा-यांचे वेतन दिले. मात्र, नर्स, डॉक्टर, सिनियर कन्सलटंट यांच्या वेतनाचे आकडे मोठे आहेत. त्यामुळे बिल मिळेपर्यंत ते देणे शक्य होत नाही. त्यादृष्टीने निवेदन महापालिकेला दिले आहे. त्यावर महापालिकेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारपर्यंत कर्मचा-यांना वेतन दिले जाईल.
 
संस्थेने बिल जमा केले नाही – विकास ढाकणे
याबाबत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे म्हणाले, ”जम्बोतील काही कर्मचा-यांनी वेतन मिळाले नसल्याने त्यांनी रोष व्यक्त केला. वैद्यकीय सुविधेवर त्याचा परिणाम झाला नाही. पगार देण्यास विलंब होत असल्याचे मान्य आहे. ठेकेदाराने बिल जमा केले नाही. बिल जमा केल्यावर दोन दिवसात तातडीने पैसे अदा केले जातील. दोन दिवसात त्यांचा पगार होईल”.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोकर भरती प्रक्रियेसंदर्भात तातडीने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणावा – अशोक चव्हाण