गणेश विसर्जनासाठी मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले. त्यामुळे मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळांना महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदांमध्येच श्रींचे विसर्जन करावे लागणार आहे.
दरवर्षी गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्यानुसार सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती श्रींचे विसर्जन नदीत करण्यात येते. मात्र, यंदा धरणामधून पाणी सोडण्यात येणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण पाणीसाठा २९.०२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९९.५७ टक्के झाला आहे. चारही धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला असतानाही गणेश विसर्जनासाठी यंदा पाणी सोडण्यात येणार नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.