पुणे : पिंपरी- चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे. ताथवडे येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओत काम करत असताना लेबर युनियनचा एक पदाधिकारी त्रास देत असल्याचं राम सापते यांनी सांगितलं आहे. वाकड पोलीस स्टेशनमध्ये राम सापते यांच्या आत्महत्ये प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
…तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही; मनसे आक्रमक
राजू सापते यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. यापुढे कोणताही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. ही धमकीच आहे, असे अमेय खोपकर यांनी सांगितले.
राजू सापते यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये त्यांनी लेबर युनियनचा पदाधिकारी राकेश मौर्या हा आपल्याला त्रास देत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे मला काम करणे शक्य नाही. याचाच निषेध म्हणून मी आत्महत्या करत असल्याचे राजू सापते यांनी व्हीडिओमध्ये म्हटले होते. हाच धागा पकडत अमेय खोपकर यांनी मनोरंजन क्षेत्रातील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही. राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचे नाही. मात्र, भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन अमेय खोपकर यांनी केले आहे.
काय म्हणाले राजू सापते?
आत्महत्येपूर्वी त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये राजू म्हणतात, नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत. माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिथे नाही. राकेश मौर्या युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.
हे कालही मी क्लीअर केलं आहे की नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी हेही सांगितलं की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट ठेवलेलं नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतवत आहेत. ते माझं कुठचंही काम सुरु होऊ देत नाहीयत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे. त्यातलं एक प्रोजेक्ट झीचं मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नाहीयत. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.