स्काय डायव्हिंग हा अत्यंत धाडसी क्रीडा प्रकार आहे ; मात्र तो तितकाच भयावह असल्याची बाब खेड तालुक्यातील वहागाव येथे पहावयास मिळाली. स्कायडायव्हिंग करत असताना एका तरुणाचा ताबा सुटल्याने तो थेट उंचीवरून खाली कोसळला. ही घटना गुरूवारी (दि. 4 नोव्हें) दुपारी 11 च्या सुमारास घडली.
पुण्यातील एका साहसी स्काय डायव्हर तरुणाने मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील स्कायडायव्हिंग सेंटर येथील एका उंच डोंगरावरून मित्रांच्या समवेत उत्तुंग भरारी घेतली ; मात्र स्कायडायव्हिंग करताना शेकडो फुट उंच गेल्यावर त्याचा ताबा सुटला.
संबंधित युवकाच्या सोबत असलेले सर्व तरुण तळेगाव जवळील भागात डोंगराच्या पलीकडे असलेल्या नियोजित ठिकाणी सहीसलामत उतरले. मात्र संबंधित तरुणाचा ताबा सुटला. खूप उंचावर असल्याने डोंगराच्या पलीकडील बाजूस येऊन तो खेड तालुक्यातील वहागाव येथील एका डोंगरावरील कड्याला धडकून उंचावर जखमी अवस्थेत अडकून पडला.
दरम्यान, वहागाव येथील स्थानिक तरुणांनी तातडीने अत्यंत जिकिरीने बेशुद्धावस्थेत असलेल्या या तरुणास डोंगरावरून बाहेर काढून रुग्णालयात पाठवून दिले असल्याचे वहागावचे स्थानिक तरुण महेंद्र नवले यांनी सांगितले. स्काय डायव्हिंग करताना जखमी झालेल्या संबधित तरुणाचे नाव मात्र समजू शकले नाही.